भिशी, आरडीच्या नावाखाली भोकरकरांना कोट्यवधींचा गंडा
By Admin | Updated: June 30, 2017 00:08 IST2017-06-30T00:07:43+5:302017-06-30T00:08:46+5:30
भोकर : भिशीद व आरडीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा करून दाम्पत्याने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार भोकरमध्ये बुधवारी उघडकीस आला.

भिशी, आरडीच्या नावाखाली भोकरकरांना कोट्यवधींचा गंडा
राजेश वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : भिशीद व आरडीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा करून दाम्पत्याने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार भोकरमध्ये बुधवारी उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी दाम्पत्याविरूद्ध गुरुवारी गुन्हा नोंदविला़ फसवाफसवीच्या या प्रकरणात गोरगरीब मजूरदार, व्यापारी, नोकरदार अडकले आहेत़
विशाल विजयकुमार कुंडगुलवार व त्याची पत्नी श्रृतिका (रा़दिवशी खुर्द, ह़ मु़ अमिननगर भोकर) यांच्या मालकीचे विशाल इंटरप्राईझेस नावाचे दुकान आहे़ काही दिवसापूर्वी या दाम्पत्याने अंजनाबाई देवराव सूर्यवंशी या महिलेला आम्ही भीसी व आऱडी़ उघडली आहे़ यात सुरुवातीला १० हजार रुपये, त्यापुढे प्रत्येक महिन्यात एक ते दोन हजाराच्या फरकेने रक्कम जमा केल्यास वर्षानंतर एक लाखाच्या रकमेवर १ लाख १९ हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर शहरातील मजूरदार, व्यापारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही असेच आमीष दाखवून या सर्वांना या जाळ्यात ओढले. दरम्यान, अंजनाबाईने या दाम्पत्याकडे चार भीसी व एक आरडी काढली़ यातून तिचे ३ लाख ३१ हजार ७०० रुपये जमा झाले होते़ जमा रक्कम मिळण्यासाठी ती कुंडगुलवार दाम्पत्याकडे गेली़ तिने पैशाची मागणी केली़ पाठपुरावा केला़ या दरम्यान आठ दिवसापूर्वी कुंडगुलवार दाम्पत्य पसार झाल्याचे लक्षात आले़ यात अल्ताफ भोजानी १३ लाख, संतोष एच़ मामीडवार ४ लाख ९३ हजार, दिगंबर घोडके ५२ हजार, राम पिंगलवाड ७६ हजार, संदिप श्रीमलवार ५० हजार, लक्ष्मीबाई मस्के ३५ हजार, सविता कदम ६२ हजार, कमलबाई माधव रेड्डी १ लाख ५० हजार यांच्यासह ६१ जणांना एकूण ३९ लाख ४१ हजाराचा फटका बसला़
अफरातफरीची ही रक्कम कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे़ अनेकांनी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी, पैसे मिळतील या हेतूने गुंतवणूक केली़ मात्र त्यांच्या हाती भोपळा पडला़ भोकर पोलिसात अंजनाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल कुंडगुलवार व श्रुतिका कुंडगुलवार यांच्याविरूद्ध गुरुवारी दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला़ पो.नि. संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुशील चव्हाण तपास करीत आहेत.