अनुदान लाटणाऱ्या १०९ जणांची नावे पोलिसात
By Admin | Updated: March 20, 2017 23:49 IST2017-03-20T23:47:15+5:302017-03-20T23:49:21+5:30
उस्मानाबाद : अनुदान देऊनही शौचालयाचे बांधकाम न करणाऱ्या १०९ जणांची नावे पोलीस ठाण्यात देण्यात आली आहेत़

अनुदान लाटणाऱ्या १०९ जणांची नावे पोलिसात
उस्मानाबाद : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत उस्मानाबाद शहरातील लाभार्थ्यांना शासनाचे अनुदान देण्यात आले आहे़ मात्र, अनुदान देऊनही शौचालयाचे बांधकाम न करणाऱ्या १०९ जणांची नावे शहर व आनंदनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहेत़ संबंधितांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत पालिकेचे अधिकारी, कर्मचारी सोमवारी रात्री पोलीस ठाण्यात ठाण मांडूून होते़
उस्मानाबाद नगर परिषदेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर पाणंदमुक्त करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत़ शहरातील अनेक लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी शासकीय अनुदान देण्यात आले आहे़ शौचालयाचा वापर न करणाऱ्यांवर गुडमॉर्निंग पथकाद्वारे कारवाईही करण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, शहरातील विविध भागात सार्वजनिक शौचालयाचे नव्याने बांधकाम, जुन्या सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती आदी कामेही पालिका प्रशासनाने पूर्ण केली आहेत़
अनुदान दिल्यानंतर मार्च अखेरपर्यंत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर करणे बंधनकारक होते़ मात्र, शहरातील तब्बल १०९ लाभार्थ्यांनी शासकीय अनुदान उचलूनही शौचालयाचे बांधकाम केलेले नाही़ संबंधित लाभार्थ्यांना पालिकेने यापूर्वी वेळोवेळी नोटीसा देऊन शौचालयाचे बांधकाम करण्याबाबत सूचना दिल्या होत्या़ मात्र, संबंधितांनी पालिकेच्या नोटीसीला केराची टोपली दाखवित शौचालयाचे बांधकाम केले नाही़ तसेच उघड्यावर शौचास जाण्याचा सपाटा सुरू ठेवला़ नोटीसा देऊनही शौचालयांचे बांधकाम न करणाऱ्या १०९ जणांची नावे पालिकेने काढली आहेत़ यातील ८१ जणांची यादी शहर पोलीस ठाण्यात तर २८ जणांच्या नावाची यादी आनंदनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे़ पालिकेचे अधिकारी, कर्मचारी रात्री तक्रार देण्यासाठी गेले होते़ मात्र, अधिकाऱ्यांसमवेत सुरू असलेल्या चर्चेमुळे उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ (प्रतिनिधी)