मनपाची नालेसफाई चोकअप
By Admin | Updated: May 25, 2014 01:32 IST2014-05-25T01:23:37+5:302014-05-25T01:32:20+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीनिमित्त करण्यात येणारी नालेसफाई मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे.

मनपाची नालेसफाई चोकअप
औरंगाबाद : महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीनिमित्त करण्यात येणारी नालेसफाई मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. या कामाच्या निविदा आचारसंहितेत अडकल्यामुळे प्रशासनाची गोची झाली आहे. काही अधिकारी निवडणुकीच्या कामातच आहेत. तर जे पालिकेत आहेत, ते नालेसफाईकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मान्सूनपूर्वी नालेसफाई होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, पालिकेतील अनेक ‘साहेब’ रजेवर असल्यामुळे सफाईच्या बाबतीत कुणीही विषय काढण्यास तयार नाही. साफसफाईकडे घनकचरा विभागाने लक्ष द्यावे. यासाठी आरोग्य विभागाने गेल्या महिन्यातच पत्र दिले आहे. साथरोगांसाठी धोकादायक असलेल्या १४६ ठिकाणांची यादीदेखील विभागाने दिली आहे. पावसाळ्यात नालेसफाईचे मोठे आव्हान मनपासमोर उभे राहू शकते. शहरात ६६ कि़ मी. लांबीचे नाले आहेत. नाल्यामधील गाळ, कचरा व अतिक्रमणे तशीच आहेत. मान्सून आठवड्यावर आला आहे. अजूनही पालिकेने त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. सत्ताधारी निवडणूक रणधुमाळीच्या थकव्यातून बाहेर येत नाहीत तो पदवीधरची आचारसंहिता लागली. काही अधिकारी सुट्यांवर गेले आहेत. ाालेसफाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने अडीच हजार घरांना दरवर्षी नाल्याच्या बॅकवॉटरचा फटका बसतो. ७ जून येण्यास १४ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात ६६ कि़ मी. लांबी असलेले नाले पालिका कसे स्वच्छ करणार हा प्रश्न आहे. रोज सुमारे ५ कि़ मी. नालेसफाई होणे गरजेचे आहे. ३ कोटी रुपयांचा खर्च नालेसफाईवर होणार आहे.उपअभियंता म्हणाले.... प्रभाग ‘अ’ मध्ये नालेसफाईचे काम सुरू झाले आहे. इतर प्रभागातील कामाची माहिती नाही. ‘अ’ ची जबाबदारी माझ्यावर आहे. ५ कि़ मी. नाले प्रभागात येतात. जेसीबीने सफाई सुरू असल्याचे उपअभियंता शेख खमर म्हणाले.