नळगीर ग्रामसभेत अन्नसुरक्षेचे ‘कालवण’
By Admin | Updated: August 24, 2014 00:20 IST2014-08-23T23:52:41+5:302014-08-24T00:20:11+5:30
उदगीर : तालुक्यातील नळगीर येथील अन्न सुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेपासून वंचित पात्र लाभार्थींनी त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करीत

नळगीर ग्रामसभेत अन्नसुरक्षेचे ‘कालवण’
उदगीर : तालुक्यातील नळगीर येथील अन्न सुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेपासून वंचित पात्र लाभार्थींनी त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करीत जोरदार हंगामा केला़ ग्रामस्थांची ही भावना लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने तात्काळ याबाबत ठराव घेतला व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे लेखी पत्राद्वारे केली़
नळगीर येथील बहुतांश पात्र लाभार्थी हे शासनाच्या अन्नसुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेपासून वंचित राहिले आहेत़ या योजनेत समाविष्ट करुन घेण्यात यावे, यासाठी या नागरिकांची सातत्याने धडपड सुरु आहे़ परंतु, त्यांना कोठेही दाद मिळत नसल्याचे व्यथा मांडत नागरिकांनी ग्रामसभेत जोरदार हंगामा केला़ गरजू व पात्र लाभार्थींनी इन कॅमेरा पार पडलेल्या ग्रामसभेत अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींच्या यादीत निवृत्त कर्मचारी, जमीन, जुमला, घर असलेल्या कुटूंबांचा तसेच एकाच कुटूंबातील एकाच शिधापत्रिकेतील व्यक्तीची वेगवेगळी कुटूंबे दाखवून त्यांचा समावेश करण्यात आल्याचा दावा केला़ नळगीर येथील काही स्वस्त धान्य दुकानाकडून समाधानकारक यादी न झाल्यामुळे बरेच लाभार्थी हे या दोन्ही महत्वपूर्ण योजनेपासून वंचित राहिले आहेत़ याबाबतची चौकशी करुन कारवाई करावी व वंचित लाभार्थींंना या दोन्ही योजनेत समाविष्ट करुन त्यांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी नळगीर ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मलाबाई लक्ष्मण सोनवळे व ग्रामविकास अधिकारी एम़ व्ही़ सुर्यवंशी यांनी गुरुवारी उदगीरच्या तहसीलदारांकडे केली आहे़ लाभार्थींची बाजू घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असला तरी त्याचा पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे लाभार्थींनी व्यक्त केले़ (वार्ताहर)
सातत्याने पाठपुरावा करुनही आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोपही लाभार्थींनी केला आहे़ त्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने या सभेत सर्वानुमते ठराव संमत केला़