नागापूरला अशुद्ध पाणीपुरवठा !
By Admin | Updated: July 14, 2014 00:59 IST2014-07-13T23:09:38+5:302014-07-14T00:59:55+5:30
परळी: परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर धरणाखालील नागापुरातच अर्धवट नळ योजनेमुळे पाण्याची समस्या उद्भवत आहे

नागापूरला अशुद्ध पाणीपुरवठा !
परळी: परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर धरणाखालील नागापुरातच अर्धवट नळ योजनेमुळे पाण्याची समस्या उद्भवत आहे तर गावात येणारे पाणी अशुद्ध येत असल्याने नागापूरकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागापूर या गावची लोकसंख्या ८ हजार असून ८०० घरे आहेत. गावाशेजारीच नागापूर धरण आहे. या धरणातून परळी शहराला नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या नागापूर धरणाशेजारी राहणाऱ्या ८ हजार लोकांना मात्र शुद्ध पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
६० वर्षांपूर्वीचीच पाणीपुरवठा अर्ध्या गावात आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तर धनगरवस्ती, नागापूर कॅम्प या भागातील लोकांच्या घशाला कोरड असल्याची तक्रार या भागातील नागरिकांची आहे. तर गावात शुद्ध पाणीपुरवठा होत नाही, जुन्या पद्धतीनेच रेतीचा वापर करुन शुद्ध पाणीपुरवठा अर्ध्या नागापूरला केला जातो आहे.
जलशुद्धीकरण रेंगाळले
जलस्वराज्य योजनेचे काम मागील १० वर्षांपासून अर्धवट आहे. येथील जलस्वराज्य योजना समिती वादग्रस्त झाली होती. त्यामुळे हे काम रेंगाळलेलेच आहे. या धरणातून नागापूरसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प व्हावा, अशी मागणी तत्कालीन सरपंच मोहन सोळंके यांनी केली आहे. नागापूरच्या नदीपात्रातून पाण्याच्या जुन्या टाकीत होणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध आहे. याऐवजी धरणातील न.प.च्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून नागापूरच्या टाकीत पाणी सोडावे, अशी मागणी सोळंके यांनी केली.
शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी
नागापुरातील जलस्वराज्य योजनेचे अर्धवट काम पूर्ण करावे
वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू करावी
नागापूरकरांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रभूअप्पा तोंडारे यांनी केली आहे.