नाफेडकडे ११ कोटींचे तुरीचे चुकारे थकित
By Admin | Updated: June 11, 2017 00:44 IST2017-06-11T00:42:15+5:302017-06-11T00:44:21+5:30
जालना : वाढीव मुदतीनंतर महिनाभरात खरेदी केलेल्या २३ हजार क्विंटल तुरीचे पैसे नाफेडकडे थकित असल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर पैशांसाठी शेतकऱ्यांना चकरा मारण्याची वेळ आली आहे.

नाफेडकडे ११ कोटींचे तुरीचे चुकारे थकित
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाढीव मुदतीनंतर महिनाभरात खरेदी केलेल्या २३ हजार क्विंटल तुरीचे पैसे नाफेडकडे थकित असल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर पैशांसाठी शेतकऱ्यांना चकरा मारण्याची वेळ आली आहे. २ हजार ३०२ शेतकऱ्यांचे ११ कोटी रूपयांचे चुकारे थकित आहेत.
नाफेडला ४० हजार क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट होते. मात्र त्यानंतरही बाजार समिती परिसरातील केंद्रातून हजारो क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली. गत एक ते दीड महिन्यात खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे देण्यास विलंब होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी खरीप पेरणीकडे वळला आहे. मात्र तूर विक्रीचे पैसे अद्यापही हातात न पडल्याने बी- बियाण्यांची खरेदी कशी करावी याची चिंंता शेतकऱ्यांना आहे. नाफेडच्या वतीने जिल्ह्यात पाच टप्प्यात तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये नाफेड प्राईस सपोर्ट फंड (पीएसएफ), बाजार हस्तक्षेप योजना, नाफेड सपोर्ट फंड, नाफेड प्राईज सपोर्ट फंड, बाजार हस्तक्षेप योजना आणि नाफेड प्राईस सपोर्ट फंड या पाच टप्यात १ लाख ७५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. त्याचे ७२ कोटी ५ लाख रूपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत.
राज्य शासनाने तूर हस्तक्षेप योजनेतून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे, अशी मागणी बदनापूर तालुक्यातील हिवरा रोषगाव येथील शेतकरी अनिरूध्द संपत शिंदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.