औरंगाबादचा नदीम भारतीय संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:16 IST2018-10-13T00:59:17+5:302018-10-13T01:16:18+5:30
औरंगाबादचा तेजतर्रार वेगवान गोलंदाज नदीम शेख आता मूकबधिरांच्या टी-२0 वर्ल्डकप स्पर्धेत आपला ठसा उमटविण्यास सज्ज झाला आहे. नवी दिल्ली येथे २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मूकबधिरांच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून, औरंगाबादचा नदीम शेख याचाही समावेश करण्यात आल्याची माहिती त्याचे प्रशिक्षक शेख हबीब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबादचा नदीम भारतीय संघात
औरंगाबाद : औरंगाबादचा तेजतर्रार वेगवान गोलंदाज नदीम शेख आता मूकबधिरांच्या टी-२0 वर्ल्डकप स्पर्धेत आपला ठसा उमटविण्यास सज्ज झाला आहे. नवी दिल्ली येथे २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मूकबधिरांच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून, औरंगाबादचा नदीम शेख याचाही समावेश करण्यात आल्याची माहिती त्याचे प्रशिक्षक शेख हबीब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
२२ ते ३0 नोव्हेंबरदरम्यान नवी दिल्ली व गुरुग्राम येथे होणाºया या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत यजमान भारतासह पाकिस्तान, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका या आठ देशांतील संघातील २00 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. आठ संघांना दोन गटांत विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघास तीन सामने खेळावे लागणार असून, यातील दोन्ही गटांतील दोन अव्वल संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत. वर्ल्डकपसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी डीफ क्रिकेट सोसायटीतर्फे बडोदा येथे २२ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरदरम्यान निवड चाचणी शिबीर झाले होते. या शिबिरात राष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर औरंगाबादचे नदीम शेख व रोहित गोरे यांच्यासह बाबासाहेब चितळकर, सुमित मिश्रा या महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड झाली होती. जबरदस्त वेग, भेदकता व अचूक टप्प्यावरील गोलंदाजीच्या जोरावर नदीम शेख याने निवड समितीला प्रभावित करीत भारतीय संघातील स्थान निश्चित केले. वर्ल्डकपसाठी शेख हबीब यांनी नदीम शेख याच्याकडून ४५ दिवस दररोज दोन सत्रांत कसून तयारी करून घेतली होती.
वसंतराव नाईक महाविद्यालयात बी.ए.ची पदवी मिळवणाºया २४ वर्षीय शेख नदीमला बालपणापासूनच क्रिकेटची आवड होती; परंतु २00३ मध्ये संजय बांगर याची भेट झाल्यानंतर नदीममध्ये खºया अर्थाने क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्याची जिद्द निर्माण झाल्याचे शेख हबीब यांनी सांगितले. अचूक टप्प्यावरील गोलंदाजी, त्या जोडीला जबरदस्त वेग आणि इनस्विंग ही नदीम शेख याच्या गोलंदाजीची वैशिष्ट्ये असून, तो एक चपळ क्षेत्ररक्षक असल्याचेही शेख हबीब यांनी सांगितले. नदीमचे वडील रफिक शेख हे माजी सैनिक असून, मुलाची वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड झाल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे सचिव सचिन मुळे यांनी नदीम शेख याचा त्याची वर्ल्डकपसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी एडीसीएचे सभासद अतुल कराड, प्रशिक्षक शेख हबीब, कर्मवीर लव्हेरा यांची उपस्थिती होती.
संधीचे सोने करायचेय
भारतीय संघात निवड होणे हा जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहे. संधी मिळाल्यास त्याचे सोने करायचे आणि भारताला वर्ल्डकप जिंकून देण्याचे आपले लक्ष्य असल्याची भावना नदीम शेख याने व्यक्त केली.
नदीमची निवड इतर खेळाडूंसाठी प्रेरक
शेख नदीमच्या रूपाने औरंगाबादच्या खेळाडूची वर्ल्डकपसाठी निवड होणे ही खूप आनंदाची बाब आहे. त्याच्या निवडीपासून प्रेरणा घेऊन अन्य खेळाडूही पुढे येतील. त्याने अडचणींवर मात करीत गाठलेली मजल ही कौतुकास्पद आहे, असे यावेळी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांनी सांगितले. यावेळी नदीम शेख याला वर्ल्डकपसाठी दिल्ली येथे विमानाने जाण्या-येण्याचे भाडे देणार असल्याची घोषणा केली.