मोबाईल, डायरीतून उलगडणार पेपरफुटीचे रहस्य
By Admin | Updated: November 6, 2014 01:37 IST2014-11-06T01:20:00+5:302014-11-06T01:37:48+5:30
औरंगाबाद : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या भरतीच्या पेपर विक्री प्रकरणाचा सूत्रधार असलेला आरोपी मकरंद खामणकर याने अटकेच्या वेळी फेकलेले आपले

मोबाईल, डायरीतून उलगडणार पेपरफुटीचे रहस्य
औरंगाबाद : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या भरतीच्या पेपर विक्री प्रकरणाचा सूत्रधार असलेला आरोपी मकरंद खामणकर याने अटकेच्या वेळी फेकलेले आपले दोन मोबाईल आणि डायरी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी जालना रोडवरील लाडगाव टोलनाक्याजवळ शोधून काढली. या दोन्ही वस्तू सापडल्यामुळे या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधारांचे रहस्य आता उलगडणार आहे. या दोन्ही वस्तूंमधून या गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकते, असे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.
यवतमाळ जि. प.त सुमारे १०० पदांसाठी २ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका फोडणाऱ्या आणि लाखो रुपये घेऊन त्या विक्री करणाऱ्या टोळीतील ११ आरोपींना आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी रात्री औरंगाबादेत मोठ्या शिताफीने अटक केली.
पेपर विक्रीचा सूत्रधार असलेला आरोपी मकरंद खामणकर याने अटकेच्या वेळी आपले दोन मोबाईल आणि एक डायरी लाडगाव टोलनाक्याजवळ फेकली होती, असे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर बुधवारी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस कर्मचारी महेश उगले, दादासाहेब झारगड यांनी लाडगाव टोलनाक्याजवळ जाऊन सर्व परिसर पिंजून काढला.
या उत्तरपत्रिका फुटी प्रकरणात यवतमाळ येथील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. कोणत्याही शासकीय भरतीसाठी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सेट करण्यासाठी एक समिती नियुक्त केलेली असते.
४या समितीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या पेपरफुटी प्रकरणात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्यामुळेच या उत्तरपत्रिका आरोपींपर्यंत पोहोचल्या, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेनेही आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.