गूढ आवाजाने शिरूरसह परिसर हादरला
By Admin | Updated: July 22, 2014 23:15 IST2014-07-22T22:58:27+5:302014-07-22T23:15:37+5:30
शिरूरकासार : शहरासह तालुक्यात सोमवारी सकाळी गूढ आवाज झाला. यामुळे नागरिक भयभीत झाले होते.

गूढ आवाजाने शिरूरसह परिसर हादरला
शिरूरकासार : शहरासह तालुक्यात सोमवारी सकाळी गूढ आवाज झाला. यामुळे नागरिक भयभीत झाले होते.
गेल्या वर्षभरापासून शिरूरसह तालुक्यात सातत्याने गूढ आवाज ऐकू येत आहेत. हे आवाज भूृगर्भातून येत असून तब्बल वीस ते पंचवीस कि.मी. पर्यंत आवाज ऐकू जातो. सोमवारी सकाळीही साडेदहा ते ११ च्या सुमारास असाच गूढ आवाज ऐकू आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकदा गूढ आवाज होऊन घरातील संसारोपयोगी वस्तूही हादरतात.
शिरूर तालुक्यात डोंगर माथ्यांचा परिसर आहे. यामुळे नेमका आवाज कशाचा होतो याची चिंता नागरिकांना आहे. गेल्या काही दिवसात दहशतवादाचा संबंध बीड जिल्ह्यातील काही लोकांशी आल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अधिकच चिंता लागते. शिरूर तालुक्यात बॉम्ब बनविले जात आहेत का? किंवा इतर काही अनुचित प्रकार घडत आहेत का? अशा चर्चा नागरिकांतून चौकाचौकामध्ये होत आहेत. येथे सातत्याने गूढ आवाज येत असला तरी प्रशासन गंभीर भूमिका घेत नसल्याने नागरिकांमधूच नाराजीही व्यक्त केली जात आहे.
सोमवारी सकाळी झालेल्या गूढ आवाजाबाबत तहसीलदार भारत सूर्यवंशी म्हणाले की, झालेल्या गूढ आवाजाची रीतसर नोंद घेण्यात येणार आहे व याबाबत वरिष्ठांना अहवाल देण्यात येणार आहे. (वार्ताहर)