सोयगाव : माळेगाव-पिंपरी पाझर तलावात शनिवारी पहाटेच्या वेळेला आणि सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान तब्बल चार वेळा गूढ आवाजाने तलाव हादरला असून या हादऱ्याने पाझर तलावाच्या संरक्षण भिंतीना तडे जाऊन पाझर तलावातील पाणी गळती होत असल्याने रबीच्या हंगामात पाणीच पाणी झाले. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. अचानक आलेल्या गूढ आवाजाचे नेमके रहस्य आहे तरी काय, याबाबत सर्वत्र चर्चा रंगली आहे.
माळेगाव-पिंपरी शिवारात जिल्हा परिषद सिंचन विभागाचा पाझर तलाव आहे. शनिवारी पहाटे अचानक चार वाजता पाझर तलावात मोठा आवाज झाल्याने शेतावर झोपलेले श्रीराम वाघ हे आवाजाने खडबडून जागे; पण त्यावेळी त्यांना आवाज नेमका कशाचा, याविषयी अंदाज लागला नाही. त्यानंतर सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान पुन्हा दोनदा आवाज झाल्यावर मात्र शेतकऱ्यांची दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
अचानक झालेल्या आवाजामुळे तलावातील पाण्याच्या लाटा उसळल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी पाहिले. त्यानंतर थेट पाझर तलावाच्या संरक्षण भिंतीला मोठे तडे गेले असून यातून पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे तलावाच्या जवळ असलेल्या दहा हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसला आहे.
-------
काय म्हणतात नागरिक
पाझर तलावाच्या बाजूलाच शेत असल्याने सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान अचानक दोनदा गूढ आवाज कानी पडला. त्यात तलावाजवळच असल्याने पाण्याच्या लाटा उसळताना दिसल्या. तेव्हा आसपास असलेेले सर्व शेतकरी बांधव जमा झालो. त्यानंतर धरणाच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसून आले. तलावातून गळती होऊ लागल्याने काही परिसर पाण्याखाली गेला आहे. - श्रीराम वाघ, शेतकरी.
रात्री शेतावर पिकांच्या रक्षणासाठी झोपलो असता पहाटे चार वाजता मला दोन आवाज कानी आले. मी उठून पहिले असता धरणाचे पाणी थेट शेतात आल्याचे आढळून आले. त्यामुळे अचानक असे काय होत आहे, अशी चर्चा मनाला लागून गेली. - शांताराम वाघ, शेतकरी
फो़टो -
माळेगाव : पिंपरी पाझर येथील या तलावात गूढ आवाजांचा हादरा, सरंक्षण भिंतीना बसले होते तडे, ग्रामस्थांच्या भेटी,
तिसऱ्या फोटोत पाण्याची संरक्षण भिंतीतून मोठ्या प्रमाणात गळती होताना दिसत आहे.