माझा शिवसैनिक शेतकऱ्यांसोबत
By Admin | Updated: June 30, 2017 00:04 IST2017-06-30T00:03:03+5:302017-06-30T00:04:37+5:30
जालना :माझा शिवसैनिक शेतकऱ्यांसोबतच असून, शेतकऱ्यांनी आंदोलनाची वज्रमूठ तशीच ठेवावी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे केले.

माझा शिवसैनिक शेतकऱ्यांसोबत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष कर्जमाफी पदरात पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी एकजूट ठेवावी. माझा शिवसैनिक शेतकऱ्यांसोबतच असून, शेतकऱ्यांनी आंदोलनाची वज्रमूठ तशीच ठेवावी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे केले.
राज्य शासनाने कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील मंठा, जालना आणि बदनापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. जालना तालुक्यातील रामनगर येथील साखर कारखाना परिसरात आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, नेते डॉ. हिकमतराव उढाण, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला
परदेशी यांच्यासह प्रातिनिधीक शेतकरी उपस्थित होेते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मन की बात आपल्याला कळते. पण देश चालवणाऱ्यांना कळत नाही. हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने लढा उभारला असून, कर्जमाफीची पूर्तता होत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात राज्यमंत्री खोतकर यांनी शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने केलेल्या लढ्याचा उल्लेख करुन राज्य शासन कर्जमाफीचा निर्णय घेण्यास अनुकूल नव्हते. मात्र, शिवसेनेने शेतकऱ्यांची बाजू लावून धरल्याने राज्य सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले. मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असते तर आंदोलनाला यश आले असते, अशी भावना त्या भागातील शेतकऱ्यांनी मांडल्याचे राज्यमंत्री खोतकर म्हणाले. याप्रसंगी माजी आ. संतोष सांबरे, सहसंपर्क प्रमुख शिवाजी चोथे, भानुदास घुगे, युवा सेनेचे जगन्नाथ काकडे, भाऊसाहेब घुगे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, हरीहर शिंदे, मनीष श्रीवास्तव, तुकाराम शेजूळ, पांडुरंग डोंगरे, मुरलीधर थेटे, शिवाजी शेजूळ, महिला आघाडीच्या सविता किवंडे, दलित आघाडीचे अॅड. भास्कर मगरे, हरिभाऊ पोहेकर, जयप्रकाश चव्हाण, बबनराव खरात, सुधाकर निकाळजे, दादाराव लहाने यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.