आईच माझी गुरू
By Admin | Updated: July 12, 2014 01:00 IST2014-07-12T01:00:40+5:302014-07-12T01:00:40+5:30
सुरेखा महाजन, बालपणापासून तिने आम्हाला स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणा शिकविला. आज मी जी काही आहे ती केवळ अन् केवळ माझ्या आईमुळेच.
आईच माझी गुरू
सुरेखा महाजन,
बालपणापासून तिने आम्हाला स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणा शिकविला. आज मी जी काही आहे ती केवळ अन् केवळ माझ्या आईमुळेच. त्यामुळे माझी आई ‘सुमन’ हीच माझी खरी गुरू आहे. आज ती आमच्यात नाही. मात्र, तिची शिकवण सदैव माझ्यासोबत आहे, असे सांगताना औरंगाबाद उच्च न्यायालय वकील संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष अॅड. सुरेखा महाजन यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
अॅड. महाजन म्हणाल्या की, मला कळते तेव्हापासून आईच्या स्वभावात असलेला तडकाफडकीपणा, स्पष्टवक्तेपणा तसेच तिची अचाट बुद्धिमत्ता आणि निर्भयता हे गुण आमच्यासाठी वरदान ठरले. तिच्या छत्रछायेखाली आम्हा भावंडांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले. तिचे मन स्वच्छ आणि सुंदर होते. पदव्युत्तर शिक्षणानंतर पुरुषप्रधान व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वकिली व्यवसायात पदार्पण क रण्याच्या माझ्या निर्णयाला तिने मला पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर पदोपदी नैतिक बळही दिले. सुख आले तरी हुरळून जाऊ नये आणि दु:खाच्या प्रसंगी स्वत:ला सावरण्याचे बळही आम्हाला तिच्याकडूनच मिळालेले आहे. एका अर्थाने जीवन जगण्याची कलाच तिने आम्हा भावंडांना शिकविली. २ आॅक्टोबर २०१३ रोजी काळाने तिला आमच्यापासून हिरावून घेतले, हे सांगताना अॅड. महाजन यांना गहिवरून आले.
आईसोबतच आदर्श गुरू आणि मैत्रीण होती. जीवनातले प्रत्येक क्षण तिच्यासोबत शेअर करीत असू. तसेच तिच्यापासून आमची कोणतीही गोष्ट कधीच लपून राहत नव्हती. अशा वात्सल्यसिंधू गुरूला गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने त्रिवार नमन.