आपसी बदल्यांचा घोडेबाजार जोरात

By Admin | Updated: June 29, 2015 00:33 IST2015-06-29T00:33:48+5:302015-06-29T00:33:48+5:30

औरंगाबाद : जिल्हा परिषदेने आपसी (म्युच्युअल) आंतर जिल्हा बदलीने जाणाऱ्या तब्बल ५८ शिक्षकांना दीड महिन्यापूर्वीच संमती दिली

Mutual swords horse | आपसी बदल्यांचा घोडेबाजार जोरात

आपसी बदल्यांचा घोडेबाजार जोरात


औरंगाबाद : जिल्हा परिषदेने आपसी (म्युच्युअल) आंतर जिल्हा बदलीने जाणाऱ्या तब्बल ५८ शिक्षकांना दीड महिन्यापूर्वीच संमती दिली; पण संमतीपत्रासोबत आवश्यक असलेले सहपत्र मात्र जाणीवपूर्वक देण्याचे टाळले. आता शाळा सुरू झाल्यानंतर संबंधित शिक्षक हे त्या त्या जिल्ह्यात रुजू होण्यासाठी गेले; पण सहपत्र नसल्यामुळे त्यांना परत पाठवले जात आहे. ते सहपत्र प्राप्त करण्यासाठी सदरील शिक्षक-शिक्षिका या शिक्षणाधिकारी कार्यालयात खेटे मारत असून तगडा ‘दाम’दिल्याशिवाय त्यांना सहपत्र दिले जात नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत.
आंतर जिल्हा बदलीने जाण्यासाठी २२२ शिक्षकांनी एकतर्फी, तर ५८ शिक्षकांनी आपसी आंतर जिल्हा बदलीचे प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागात सादर केले आहेत. शासनाने यंदा शिक्षकांच्या बदल्या थांबवल्या असून केवळ आपसी बदल्यांचाच विचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दीड महिन्यापूर्वी ५८ शिक्षकांच्या संमतीपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. संमतीपत्रासोबतच विहित नमुन्यातील सहपत्र देणे अनिवार्य असते. सहपत्रामध्ये शिक्षकाचा जात प्रवर्ग, निवड प्रवर्ग, चौकशी सुरू असल्यास त्याबद्दलचे सविस्तर विवरण, शिक्षक कोणत्या शाळेवर केव्हापासून काम करत आहे. सध्या त्याची पदस्थापना कोठे आहे, अशी सविस्तर ‘कुंडली’ सहपत्रावर असते.
यासंदर्भात शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, सहपत्रावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असते. त्यांनी अद्याप कोणत्याही शिक्षकाच्या सहपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. स्वाक्षरी मिळाल्यास संबंधित शिक्षकांना ते दिले जाईल. दुसरीकडे मात्र, शिक्षण विभागात आंतर जिल्हा बदलीबाबतच्या कामासाठी जिल्हा परिषदेचा पूर्णवेळ लिपिक नियुक्त आहे. पण व्यवहाराची चर्चा होऊ नये म्हणून या कामासाठी शेंदुरवादा येथील जि.प. शाळेवर कार्यरत पदवीधर प्राथमिक शिक्षक प्रतिनियुक्तीवर तैनात करण्यात आलेला आहे. या शिक्षकांच्यामार्फत ज्याचा व्यवहार होईल, त्यालाच आपसी आंतर जिल्हा बदलीसाठी आवश्यक सहपत्र तात्काळ उपलब्ध करून दिले जाते. आतापर्यंत अवघ्या ५-६ शिक्षकांनाच सहपत्र मिळाले असून ते येथून कार्यमुक्त झाले आहेत. उर्वरित ५० ते ५२ शिक्षक सहपत्र मिळविण्यासाठी सिंधुदुर्ग, चंद्रपूर येथून खेटे मारत आहेत; पण त्यांना सहजासहजी ते दिले जात नाही.

Web Title: Mutual swords horse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.