मस्टरवर तीनशे मजूर, कामावर एकही नाही
By Admin | Updated: May 18, 2017 23:16 IST2017-05-18T23:15:50+5:302017-05-18T23:16:54+5:30
बीड :मस्टरवर तीनशे मजुरांची नोंद असताना प्रत्यक्षात कामावर मात्र एकही मजूर उपस्थित नव्हता. बीड तालुक्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला

मस्टरवर तीनशे मजूर, कामावर एकही नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विकासकामांसोबत मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून सुरु केलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कागदोपत्री मजूर दाखवून शासन निधी कसा लाटला जातो हे अधिकाऱ्यांनी केलेल्या ‘सरप्राईज व्हिजिट’मध्येच बुधवारी उघडकीस आले. मस्टरवर तीनशे मजुरांची नोंद असताना प्रत्यक्षात कामावर मात्र एकही मजूर उपस्थित नव्हता. बीड तालुक्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला असून रोहयो गावपुढाऱ्यांसाठी कुरण बनल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या रोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी कृषी अधिकारी, तांत्रिक अधिकाऱ्यांसमवेत बीड तालुक्यातील नेकनूर, भंडारवाडी व कळसंबर या तीन गावांत सुरु असलेल्या रोहयो कामांना बुधवारी भेट दिली. मस्टरवर शेकडो मजूर कामावर असल्याची नोंद असताना प्रत्यक्षात बोटावर मोजण्याएवढेच मजूर दिसून आले. कळसंबर येथे तर एकही मजूर कामाच्या ठिकाणी हजर नव्हता. भागवत यांनी गटविकास अधिकारी रवींद्र तुरुकमारे यांना तपासणी अहवाल पाठवून यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रोहयो कामांत कागदी घोडे नाचविणाऱ्यांवर पंचायत समिती प्रशासन कुठली कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीडीओ आजारी रजेवर
बीड पं.स.चे गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोकाटे हे आजारी रजेवर गेले आहेत. त्यांनी कठोर भूमिका घेतल्याने त्यांना रजा देण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.