खून करून प्रेत शेतात फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:25 IST2017-08-30T00:25:57+5:302017-08-30T00:25:57+5:30
तरूणीचा खून करून तिचे प्रेत नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते रुई बु़ रस्त्यावर एका शेतात फेकून दिल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे़ सदर तरूणीचा खून जवळपास ५ ते ६ दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे़

खून करून प्रेत शेतात फेकले
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंटूर : तरूणीचा खून करून तिचे प्रेत नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते रुई बु़ रस्त्यावर एका शेतात फेकून दिल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे़ सदर तरूणीचा खून जवळपास ५ ते ६ दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे़
तालुक्यातील घुंगराळा ते रुई बु. रस्त्याच्या उत्तरेस घुंगराळा येथील शेतकरी माधव पाटील ढगे यांच्या सोयाबीनच्या शेतात एका अनोळखी तरूणीचा डोक्यात दगड घालून खून केल्याने प्रथमदर्शनी दिसत आहे़ दुर्गंधी आल्याने काही स्थानिकांनी तेथे पाहिले असता युवतीचे प्रेत आढळले़
याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली़ घटनास्थळी बघ्याची गर्दी जमली. कुंटूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, बीट जमादार बालाजी गीते घटनास्थळी पोहोचले़ ही घटना पाच ते सहा दिवसांपूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे़ मयत तरूणी ही अंदाजे १७ ते १८ वर्षे वयोगटातील आहे़ तरूणीच्या अंगावर लाल रंगाचा पंजाबी पोशाख आहे़ सदर युवती कोण, कुठली आहे याचा तपास लावण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे़ पाच ते सहा दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेप्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला असून पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत.