नरसी येथील बेपत्ता व्यापाऱ्याचा खून

By Admin | Updated: October 14, 2014 00:11 IST2014-10-13T23:36:18+5:302014-10-14T00:11:21+5:30

नरसी फाटा: नरसी येथून बेपत्ता झालेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह आंध्र प्रदेशातील कौलासच्या जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला़

The murder of a missing merchant in Narsi | नरसी येथील बेपत्ता व्यापाऱ्याचा खून

नरसी येथील बेपत्ता व्यापाऱ्याचा खून

नरसी फाटा: नरसी येथून बेपत्ता झालेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह आंध्र प्रदेशातील कौलासच्या जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला़ आर्थिक व्यवहारातून व्यापाऱ्याचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे़
नरसी येथील किरणा व्यापारी सत्यवान तम्मेवार (वय ३२) हे ७ आॅक्टोबर रोजी मुलाला शाळेत सोडण्यासाठी नायगाव येथे गेले होते़ त्यानंतर ते घरी परतले नाहीत़ याबाबत कुटुंबियांनी नायगाव ठाण्यात तक्रार नोंदविली होती़ पोलिसांनी तम्मेवार यांच्या मोबाईल कॉलच्या नोंदीवरुन तपासाला दिशा देण्याचा प्रयत्न केला़ शेवटच्या टप्प्यात मोबाईल कॉलचे लोकेशन आंध्र प्रदेशातील बिचकुंदा मंडळ जि़ निजामाबाद परिसरात असल्याचे आढळून आले़ दरम्यान, नायगाव येथील व्यापारी अविनाश रामराव अंकुलवार यांच्याशी आर्थिक व्यवहाराची माहिती तम्मेवार यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली़ या अनुषंगानेही तपास केला असता तम्मेवार यांच्या मोबाईलवर अंकुलवार यांच्याशी वारंवार संभाषण झाल्याचे सीडीआर रेकॉर्डवरुन निष्पन्न झाले़ अंकुलवार यास ताब्यात घेवून चौकशी केली असता अन्य साथीदारांच्या मदतीने सत्यवान तम्मेवार यांची हत्या करुन मृतदेह आंध्र प्रदेशातील कौलासच्या जंगलात फेकून दिल्याची कबुली अविनाश अंकुलवार याने दिली़
चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून नायगाव ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे़ नायगाव, नरसी, शंकरनगर येथील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून तम्मेवार यांना श्रद्धांजली वाहिली़ प्रतिष्ठित व्यापारी राजेश भिलवंडे, बालाजीराव चिंतावार यांनी तम्मेवार कुटुंबियांचे सांत्वन केले़ घटनेचा छडा लावण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर जगताप, पोहेकॉ़ कानगुले, पंतोजी सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले़
असा रचला हत्येचा कट
या प्रकरणातील आरोपी अविनाश अंकुलवार याने व्यवसाय थाटण्यासाठी तम्मेवार यांच्याकडून काही रक्कम घेतली होती़ यापैकी काही रक्कम परत केली़ मात्र अद्यापही ८ ते ९ लाख रुपये देणे बाकी होते़ या पैशासाठी तगादा लावला जात असल्याने अंकुलवार याने तम्मेवार यांच्या हत्येचा कट रचला़ ७ आॅक्टोबर रोजी पैसे देण्याचे निमित्त करुन सत्यवान यांना नायगावला बोलावून घेतले़ तद्नंतर इंडिका कार क्रमांक एम़एच़ २६ ए़एफ़ १९४४ मध्ये अन्य साथीदार श्याम बालाजी शिंदे, उमेश विठ्ठलराव फुलारी, अविनाश बालाजी धुमाळ यांना सोबत घेवून कार बोधनमार्गे आंध्र प्रदेशात नेली़ गाडीतच तम्मेवार यांच्यावर चाकूने वार करण्यात आले़ बेशुद्ध होताच गळा दाबून हत्या करण्यात आली़ हे कूकृत्य लपवण्यासाठी क्रूरतेचा कळस गाठत मृतदेह कंबरेपर्यंत जाळून कौलासच्या जंगलात फेकून दिला़ आरोपींच्या कबुलीनुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह व गुन्ह्यात वापरलेली कार ताब्यात घेतली़

Web Title: The murder of a missing merchant in Narsi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.