मुंजाजी डुकरेला चार दिवसांची पोलिस कोठडी
By Admin | Updated: July 7, 2014 00:18 IST2014-07-07T00:13:05+5:302014-07-07T00:18:36+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी पीएमडी कंपनीच्या माध्यमातून हजारो ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपनीचा मुख्य मालक मुंजाजी डुकरे आणि त्याचा सहकारी कृष्णा आबूज या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली

मुंजाजी डुकरेला चार दिवसांची पोलिस कोठडी
विठ्ठल भिसे, पाथरी
पीएमडी कंपनीच्या माध्यमातून हजारो ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपनीचा मुख्य मालक मुंजाजी डुकरे आणि त्याचा सहकारी कृष्णा आबूज या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे़ तपासामध्ये अनेक प्रकार उघडकीस येणार आहेत़ दरम्यान आज दुसऱ्या दिवशीही पोलिस ठाण्यामध्ये या आरोपीस पाहण्यासाठी गुंतवणूकदारांची मोठी गर्दी दिसून आली़
पाथरी तालुक्यातील खेडुळा येथील मुंजाजी डुकरे याने पीएमडी कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दोन वर्षांत कोट्यवधींचा गंडा घातला़ कंपनी स्थापन केल्यानंतर परभणी जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही या कंपनीचे जाळे पसरविले़ सुरुवातीच्या काळात या कंपनीला गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना दामदुप्पट रक्कम मिळत असल्याने या कंपनीकडे ग्राहकांचा लोंढा वाढला़ आॅनलाईन पद्धतीने कंपनीने ग्राहकांचे पैसे कंपनीच्या खात्यात वर्ग करून घेतले़ पाथरीत काही ग्राहक दहा ते पंधरा लाख तर ग्राहकांचे ५० लाखांपर्यंत या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याचे उघड होऊ लागले आहे़ मोठी गुंतवणूक करून काही ग्राहक फसले असले तरी आता समोर येण्यास तयारही होत नाहीत़ ग्राहकांनी या कंपनीच्या विश्वासावर अनेक ग्राहकांना कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडलेले आहे़ पाथरी हे या कंपनीचे मुख्य केंद्र असल्याने जिल्ह्याबाहेरील गुंतवणूकदारांची पाथरीकडे रीघ लागलेली आहे़ या प्रकरणी कंपनीचा मुख्य सूत्रधार मुंजाजी डुकरे आणि त्याचा सहकारी कृष्णा आबूज या दोघांना ५ जुलै रोजी अटक झाल्यानंतर ६ जुलै रोजी या दोन्ही आरोपींना पाथरीच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी या आरोपींना दिली आहे़ तपासामध्ये आरोपींकडून अनेक मोटारगाड्या तसेच मिळवलेली मालमत्ता बाहेर येणार आहे़ कंपनीचे पाथरी येथील सर्व कार्यालये ओस पडले असले तरी ग्राहक मात्र आरोपींचा चेहरा पाहण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये हजेरी लावत आहेत़
बँक स्टेटमेंटवरून उघड होणार घबाड
पीएमडी कंपनीची स्थापना झाल्यानंतर कंपनीचा मुख्य प्रवर्तक मुंजाजी डुकरे याने पाथरी आणि मानवत येथील तीन राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कंपनीच्या नावे खाते उघडून कंपनीचा बराच व्यवहार या खात्यावर केला़ सद्यस्थितीत या खात्यात मोठी रक्कम जमा नसली तरी पोलिसांनी बँकेकडून या खात्याचे स्टेटमेंट मागविले आहे़ या स्टेटमेंटवरून कंपनीमध्ये मागील दोन वर्षात किती उलाढाल झाली याचा आकडा बाहेर येणार आहे़
सॉफ्टवेअरमधील आकडा वाढणार
पोलिसांनी पीएमडी कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीच्या संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये गोळा असलेली माहिती संकलित केली़ यामध्ये २५ कोटी ३९ लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याचे दिसत असले तरी हा आकडा १०० कोटींच्या आसपास असल्याचा अंदाज आहे़ यामुळे मुंजाजी डुकरे याला अटक झाल्यानंतर राज्यातील इतर ठिकाणाहून गुंतवणूकदार पाथरीमध्ये दाखल होत आहेत़
पीएमडी कंपनीचा भंडाफोड झाल्यानंतर ग्राहक या कंंपनीकडे पैसे परत करा म्हणून कंपनीचा मालक मुंजाजी डुकरे याच्याकडे तगादा लावत होते़ दोन महिने पाथरीत ग्राहक आणि कंपनीमध्ये शीतयुद्ध चालू होते़ ग्राहकांचा तगादा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जिल्ह्यातील काही मातब्बर लोकांना हाताशी धरून मुंजाजी डुकरे याने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला़ यामध्ये त्याने करोडो रुपयांची उधळपट्टी केल्याची चर्चा आहे़ या प्रकरणी एका नातेवाईकांकडून आठ दिवसांपूर्वी जप्त केलेली मोटारगाडी वगळता अद्याप पोलिसांच्या हाती दुसरे काही लागले नाही़
सीआयडीमार्फत तपास व्हावा : गुंतवणूकदारातून होत आहे मागणी
दुप्पट रक्कमेच्या आमिषाला बळी पडलेल्या हजारो ग्राहकांनी आता या प्रकरणी सीआयडीमार्फत स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी केली आहे़ शंभर कोटीच्या आसपास हा व्यवहार असल्याने या प्रकरणी पारदर्शक चौकशी स्थानिक पोलिसांकडून होणार नाही, अशी भावनाही निर्माण होत आहे़