नगरसेविका यशश्री बाखरियांंना दिलासा
By Admin | Updated: June 14, 2016 00:11 IST2016-06-14T00:05:21+5:302016-06-14T00:11:50+5:30
औरंगाबाद : वॉर्ड क्र. ४७ राजाबाजारच्या नगरसेविका यशश्री बाखरिया यांना अपात्र घोषित करणारा मनपा आयुक्तांचा आदेश

नगरसेविका यशश्री बाखरियांंना दिलासा
औरंगाबाद : वॉर्ड क्र. ४७ राजाबाजारच्या नगरसेविका यशश्री बाखरिया यांना अपात्र घोषित करणारा मनपा आयुक्तांचा आदेश तसेच यशश्री यांचे जन्माचे प्रमाणपत्र रद्द करणाऱ्या वैद्यकीय संचालकांच्या आदेशाला न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. के. एल. वडणे यांनी सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. यशश्री यांना तूर्तास नगरसेविका म्हणून काम पाहण्यास खंडपीठाने परवानगी दिली. तसेच प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचा आदेश देऊन याचिकेची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली आहे.
यशश्री बाखरिया यांना मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ३ जून रोजी अपात्र घोषित केले होते. जन्माचे खोटे प्रमाणपत्र देऊन निवडून आल्यापासून आजपर्यंत मनपाकडून घेतलेले सर्व आर्थिक लाभ परत करावेत, असे आदेशात म्हटले आहे. या निर्णयाला बाखरिया यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. बाखरिया यांचे वय कमी असून त्यांनी खोटे जन्म प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढविण्याचा आरोप गजेंद्र सिद्ध यांनी केला होता. या प्रकरणात मनपा आयुक्तांसह निवडणूक आयोगापर्यंत तक्रारी करण्यात आल्या होत्या. शासन निर्देशानुसार महापालिकेने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. म्यशश्री यांची जन्मतारीख १५ मे १९९५ आहे. मनपा निवडणुकीत त्यांनी १५ जानेवारी १९९४ अशी जन्मतारीख सादर केली होती. हे आदेश रद्द करावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सोमवारी सुनावणीच्या वेळी याचिकाकर्तीच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, मनपा आयुक्तांना नगरसेवकांना अपात्र घोषित करण्याचे अधिकार नाहीत. सकृतदर्शनी असा मुद्दा उपस्थित झाल्यास आयुक्तांनी सदर वाद न्यायालयात पाठविणे अपेक्षित आहे.