अवैध नळकनेक्शनधारक नगर पालिकेच्या रडारवर !
By Admin | Updated: May 20, 2017 23:35 IST2017-05-20T23:35:01+5:302017-05-20T23:35:33+5:30
उस्मानाबाद : नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्व मालमत्तांचा सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेअंती अनेक धक्कादायक बाबी चव्हाट्यावर आल्या आहेत.

अवैध नळकनेक्शनधारक नगर पालिकेच्या रडारवर !
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्व मालमत्तांचा सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेअंती अनेक धक्कादायक बाबी चव्हाट्यावर आल्या आहेत. शहरामध्ये सुमारे ३२ घरे आहेत. मात्र, या सर्व मालमत्ताधारकांकडे मिळून नळकनेक्शची संख्या केवळ सोळा हजार एवढी अल्प आहे. नळजोडणीतील हे गौडबंगाल समोर आल्यानंतर आता नगर परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अवैध नळकनेक्शनधारकांमुळे नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याचे सांगत अवैध नळकनेक्शन नियमित करण्यासाठी ३० जुलैपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. या मुदतीनंतर अवैध नळकनेक्शनधारकास दहा हजार रूपये दंड आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला आहे.
नगर परिषदेची सर्वसाधारण सभेला नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजेच्या सुमारास सुरूवात झाली. सभेच्या प्रारंभी विषय पत्रिकेवरील विषयांना मंजुरी दिल्यानंतर अवैध नळकनेक्शनचा विषय चर्चेला आला. सर्वेक्षणापूर्वी पालिकेच्या रेकॉर्डवर केवळ १६ हजार घरे होती. परंतु, सर्वेक्षणाअंती या घरांची संख्या ३२ हजारावर जावून ठेपली आहे. असे असतानाच दुसरीकडे या सर्व घरधारकांकडे मिळून केवळ १६ हजार नळकनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती राजेनिंबाळकर यांनी सभागृहासमोर मांडली. या माहितीने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही आवाक झाले. हजारोंच्या संख्येने अवैध नळकनेक्शन असल्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना पाणीपट्टी भरूनही गरजेनुसार पाणी मिळत नाही, असे ते म्हणाले. अशा नळकनेक्शनधारकांविरूद्ध काय कारवाई करावी? असा सवाल त्यांनी उपस्थित सदस्यांकडे केला. त्यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आपापली मते मांडली. यामध्ये राष्ट्रवादीचे गटनेते युवराज नळे, सदस्य प्रदीप मुंडे, माणिक बनसोडे, अभय इंगळे आदींनी अशा अवैध नळकनेक्शन धारकांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना केली. अवैध नळकनेक्शनमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांवरही अन्याय होत आहे. त्यामुळे कोणाचीही मुलाहिजा न बाळगता धडक मोहीम हाती घ्यावी, असे सत्तााारी सदस्यांनी सांगितले. दरम्यान, सर्वांची मते विचारात घेवून नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी अवैध नळकनेक्शन धारकांविरूद्ध पालिकेच्या वतीने धडक मोहीम हाती घेत असल्याचे सांगत ३० जुलैच्या आत नागरिकांनी अवैध कनेक्शन नियमित करून घ्यावे. जे नागरिक या मुदतीनंतरही कनेक्शन नियमित करून घेणार नाहीत, त्यांना सुमारे दहा हजार रूपये दंड आणि फौजदारी कारवाई केली जाईल. एवढेच नाही तर संबंधित नागरिकास उजनी योजनेचे कनेक्शनही दिले जाणार अशा स्वरूपाचा निर्णय घेतला असता, त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे अवैध नळकनेक्शनधारक आता पालिकेच्या रडारवर आले आहेत.