पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी तरी मनपाच्या नोटिसा
By Admin | Updated: August 2, 2016 00:26 IST2016-08-02T00:20:16+5:302016-08-02T00:26:26+5:30
औरंगाबाद : एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर थकविलेल्या नागरिकांना नोटिसा पाठवून कर अदालतमध्ये चर्चेला बोलावण्याचे काम मनपाने यापूर्वीच सुरू केले आहे.

पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी तरी मनपाच्या नोटिसा
औरंगाबाद : एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर थकविलेल्या नागरिकांना नोटिसा पाठवून कर अदालतमध्ये चर्चेला बोलावण्याचे काम मनपाने यापूर्वीच सुरू केले आहे. आतापर्यंत दोन कर अदालत यशस्वी झाल्यानंतर प्रशासनाने छोट्या थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला आहे. वॉर्ड कार्यालयांतर्फे पाच हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात येत आहे. नोटीस पाहून काही नागरिक वॉर्डांमध्ये कराचा भरणा करीत आहेत.
शहरातील १ लाख ३१ हजार मालमत्ताधारकांनी सुमारे २९० कोटी रुपये मालमत्ताकराचे थकविले आहेत. मागील ३० वर्षांमध्ये मनपाने कधीच मालमत्ताकराच्या थकबाकीची वसुली केलेली नाही. दरवर्षी थकबाकीचा आकडा फुगत गेला. अलीकडेच या थकबाकीवर २४ टक्के व्याज लावण्याचे अधिकारही शासनाने मनपाला दिले आहेत.
पूर्वी मनपाचे अधिकारी सोयीस्करपणे थकबाकीचा आकडा लपवून ठेवत असत. चालू आर्थिक वर्षाची मागणी आणि वसुली या दोनच मुद्यांवर अधिकाऱ्यांचा भर असायचा.
अलीकडेच मनपा प्रशासनाने मालमत्ताकराच्या थकबाकीकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे. आतापर्यंत मोठ्या थकबाकीदारांसाठी दोन कर अदालतीही घेण्यात आल्या. या कर अदालतमध्ये जागेवरच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात आले. काही मालमत्ताधारकांनी कर अदालतमध्ये पैसे भरून टाकले.
मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी यंदा मालमत्ताकरातून २३० ते २५० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. आतापासूनच मनपाने वेगवेगळ्या प्रकारे तयारी केल्यास मार्चअखेर उद्दिष्ट साध्य होईल, असा अंदाज आयुक्तांचा आहे. करमूल्य व निर्धारण विभागाला पूर्वी पूर्णवेळ अधिकारी नव्हते. आता वसंत निकम यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ज्यांच्याकडे अगदी दोन ते तीन वर्षांचे पैसे थकले असतील त्यांना नोटीस बजावण्यात येत आहे. मनपाच्या नोटिसा पाहून नागरिक वॉर्ड कार्यालयांमध्ये पैसे भरण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले.