विपश्यना केंद्राच्या परिसरातील शांततेसाठी महापालिकेने लक्ष द्यावे
By Admin | Updated: July 13, 2014 00:25 IST2014-07-13T00:15:49+5:302014-07-13T00:25:39+5:30
नांदेड : धम्मनिरंजन विपश्यना केंद्राच्या माध्यमातून शहराची वेगळी ओळख निर्माण होईल़ यासाठी महापालिकेने या परिसरातील शांतता कायम ठेवण्यासाठी इतर गोष्टींवर निर्बंध घालावेत,
विपश्यना केंद्राच्या परिसरातील शांततेसाठी महापालिकेने लक्ष द्यावे
नांदेड : धम्मनिरंजन विपश्यना केंद्राच्या माध्यमातून शहराची वेगळी ओळख निर्माण होईल़ यासाठी महापालिकेने या परिसरातील शांतता कायम ठेवण्यासाठी इतर गोष्टींवर निर्बंध घालावेत, अशी सूचना माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़
गोदावरी नदीकाठावरील नवीन डंकीन परिसरातील धम्मनिरंजन विपश्यना केंद्रात ध्यानसत्र उभारण्यात येत आहे़ आयोजित सोहळ्यात ते बोलत होते़ विपश्यना केंद्र, नांदेड व महापालिकेच्या वतीने शनिवारी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ यावेळी पालकमंत्री डी़ पी़ सावंत, संतबाबा बलविंदरसिंघजी, माजी खा़ भास्करराव पाटील खतगावकर, आ़ ओमप्रकाश पोकर्णा, उपमहापौर आनंद चव्हाण, मनपा आयुक्त जी़ श्रीकांत, नगरसेविका डॉ़ करूणा जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती़
खा़ चव्हाण म्हणाले, गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर एका चांगल्या कामाला सुरूवात होत आहे़ नांदेड शहरात चांगले उपक्रम राबविण्यासाठी माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे़ नेहमीच्या कार्यक्रमापेक्षा ध्यानमग्न होवून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला़ त्यामुळे मन प्रसन्न झाले़ नदीकाठावरील निसर्गरम्य परिसरात केवळ पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडत होता़ त्यामुळे एकाग्रता अनुभवता आली़ महापालिकेने या परिसरातील शांतता कायम ठेवण्यासाठी इतर गोष्टींना निर्बंध घालावेत़
पालकमंत्री सावंत म्हणाले, ध्यान करताना श्वास व आपले किती जवळचे नाते आहे, हे समजून घेता आले़ धकाधकीच्या जीवनात ध्यानसाधना ही काळाची गरज आहे़ विपश्यना केंद्र नांदेडला होण्यासाठी महापालिकेने ५ एकर जागा दिली़
पालकमंत्री या नात्याने मलाही खारीचा वाटा उचलता आला़ नदीकाठच्या या सुंदर परिसरात येण्यासाठी चांगला रस्ता आवश्यक असून महापालिकेने याची जबाबदारी घ्यावी़ या ठिकाणी येणाऱ्या साधकाला नांदेड शहर स्वच्छ शहर वाटले पाहिजे, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे़
कार्यक्रमास विपश्यना केंद्राचे आचार्य चंद्रशेखर दहिवले, गौतम भावे, डॉ़ संग्राम जोंधळे, कुलकर्णी, चालीकवार यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)