सुविधा न देताच मनपाची वसुली
By Admin | Updated: January 15, 2016 23:55 IST2016-01-15T23:49:47+5:302016-01-15T23:55:36+5:30
औरंगाबाद : पाणीपुरवठ्याची बोंब आणि कचरा उचलला गेला नसतानाही महापालिकेने मागील सहा महिन्यांत या सेवा दिल्याचे सांगत सातारा- देवळाई नगर परिषदेकडे ५१ लाखांहून अधिक रकमेची मागणी करणारे पत्र दिले आहे.

सुविधा न देताच मनपाची वसुली
औरंगाबाद : पाणीपुरवठ्याची बोंब आणि कचरा उचलला गेला नसतानाही महापालिकेने मागील सहा महिन्यांत या सेवा दिल्याचे सांगत सातारा- देवळाई नगर परिषदेकडे ५१ लाखांहून अधिक रकमेची मागणी करणारे पत्र दिले आहे.
महापालिकेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांनी शुक्रवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हे पत्र पाठविल्याने सातारा- देवळाईतील नागरिक आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सातारा- देवळाई नगर परिषदेचा भाग महापालिकेत २१ मे रोजी २०१५ रोजी समाविष्ट करण्यात आला. दरम्यानच्या काळात मनपाने येथे आरोग्य केंद्र फक्त तडकाफडकी सुरू केले, एक वैद्यकीय अधिकारी, नर्स व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.
६ कोटी ६५ लाखांच्या जवळपास निधी मनपाने नगर परिषदेच्या खात्यावर वर्ग केला आहे; परंतु पूर्वीची वसुली आणि चालू वर्षाची वसुली, अल्पसंख्याकबहुल वसाहत धनादेश प्राप्त, अशी एकूण १ कोटी २३ लाख २४ हजार १२२ रुपये जमा झाले होते; परंतु या काळात समाविष्टतेचा वाद उफाळून आला आणि कायदेशीररीत्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढून हरकती व सूचना मागितल्या.
वर्ग झालेली रक्कम व हिशोब परत करावा, असे मागणीपत्र नगर परिषदेने १ जानेवारी १६ रोजी पदभार सोपविल्यावरच दिले. या ६ महिन्यांच्या काळात महापालिकेने पाणीपुरवठ्यासह कर्मचारी वेतन, टँकरद्वारे पाणी खर्च, घनकचरा व्यवस्थापन खर्च, आरोग्य विभाग खर्च, असा एकूण १ कोटी ७४ लाख ३३ हजार १०३ रुपये खर्च झाले असल्याचा दावा केला आहे.
महानगरपालिकेने प्राप्त निधीपेक्षा ५१ लाख ८,९८१ रुपये अधिकचे खर्च केले असून, ते नगर परिषदेने मनपाला वर्ग करावेत, असे नोटिसीद्वारे कळविले आहे. नागरी समस्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे बाळासाहेब गायकवाड, अप्पासाहेब हिवाळे, स्वप्नील शिरसाट, दीपक गायकवाड, राहुल शिरसाट, शेख झिया, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल शिंदे, अलियार खान आदींनी दिला आहे.