मनपा अधिकाऱ्यांना आयुक्तांची समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:17 IST2016-01-14T23:48:00+5:302016-01-15T00:17:12+5:30
औरंगाबाद : वॉर्डातील विकासकामांची तक्रार करण्यासाठी आलेल्या नगरसेवकांना मनपातील उपायुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांनी दालनाबाहेर काढले.

मनपा अधिकाऱ्यांना आयुक्तांची समज
औरंगाबाद : वॉर्डातील विकासकामांची तक्रार करण्यासाठी आलेल्या नगरसेवकांना मनपातील उपायुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांनी दालनाबाहेर काढले. त्याबद्दल महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ त्यानंतर प्रभारी मनपा आयुक्तांनी दोन्ही अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली़
नगरसेवक कमलाकर जगताप यांनी काही दिवसांपूर्वीच मुकुंदवाडी मनपा शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात तक्रार केली होती. संबंधित मुख्याध्यापकांच्या बदलीच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी ते शिक्षणाधिकारी तथा उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडे गेले़ तेव्हा निकम यांनी आपल्याला दालनाबाहेर जाण्यास सांगितल्याचा आरोप जगताप यांनी केला. त्याचप्रमाणे गलिच्छ वस्ती सुधार समितीचे सभापती सुभाष शेजवळ हे रमाई घरकुल योजनेच्या संचिकेसंदर्भात कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनीही कामात असल्याचे सांगून बाहेर थांबण्यास बजावले. या दोघांनीही गुरुवारी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडे वरील प्रकाराची तक्रार केली. तुपे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली़ त्यांनी प्रभारी आयुक्तांनाही माहिती दिली. केंद्रेकर यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना समज दिली.