महापालिकेला लागले नोकर भरतीचे डोहाळे
By Admin | Updated: November 16, 2015 00:41 IST2015-11-16T00:33:04+5:302015-11-16T00:41:33+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या महानगरपालिकेस आता नोकर भरतीचे डोहाळे लागले आहेत. दोन वर्षांपूर्वीच महानगरपालिका ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात आली.

महापालिकेला लागले नोकर भरतीचे डोहाळे
सुनील कच्छवे , औरंगाबाद
आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या महानगरपालिकेस आता नोकर भरतीचे डोहाळे लागले आहेत. दोन वर्षांपूर्वीच महानगरपालिका ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात आली. त्यामुळे मनपा प्रशासनाने पदांचा नवीन आकृतिबंध तयार केला असून, तो लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. मनपात मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करून हित साधण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
महानगरपालिकेत याआधी १९९१ साली नोकर भरती झाली होती. त्यानंतर अपवाद वगळता नवीन भरती झालेली नाही. दुसरीकडे शहराची लोकसंख्या कित्येक पट्टींनी वाढली.
मनपाच्या हद्दीतही वाढ झाली. त्यामुळे पालिकेवरील कामाचा ताण वाढला आहे. शिवाय विविध कारणांनी अनेक पदे रिक्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या दर्जात सुधारणा झाली असून, आता मनपा ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात आली आहे. त्यामुळे ‘क’ वर्गाचा आकृतिबंध लागू होणार आहे. राज्यातील ‘क’ वर्गातील मनपात औरंगाबाद मनपापेक्षा किती तरी अधिक पदे आहेत.
त्यामुळे मनपा प्रशासनाने आता पदांचा नवीन आकृतिबंध तयार केला आहे. हे काम दोन महिन्यांपासून सुरू होते. आस्थापना अधिकारी भालचंद्र पैठणे यांनी हा आकृतिबंध नुकताच तयार करून आयुक्तांना सादर केला आहे. आता मनपा आयुक्तांकडून हा आकृतिबंध मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.