गंगापुरातील ग्रामपंचायतींना महावितरणचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:05 IST2021-09-27T04:05:52+5:302021-09-27T04:05:52+5:30

गंगापूर/लासूर स्टेशन : तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायतींवर वीजबिले थकीत असल्यामुळे महावितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पाणीपुरवठ्याचे १२० ...

MSEDCL shocks Gangapur gram panchayats | गंगापुरातील ग्रामपंचायतींना महावितरणचा ‘शॉक’

गंगापुरातील ग्रामपंचायतींना महावितरणचा ‘शॉक’

गंगापूर/लासूर स्टेशन : तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायतींवर वीजबिले थकीत असल्यामुळे महावितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पाणीपुरवठ्याचे १२० कनेक्शन तोडण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बिले अदा केली नाहीत तर, पथदिव्यांसह इतर थकीत ग्रामपंचायतींचाही वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. तर तोडलेली वीज जोडणी पूर्ववत करून देण्याची मागणी आ. प्रशांत बंब यांनी महावितरणकडे केली आहे.

तालुक्यात ११० ग्रामपंचायती अंतर्गत १४८ पाणीपुरवठा जोडणीचे चालू वर्षाचे १ एप्रिलपासून १ कोटी रुपये थकले आहेत. यामुळे महावितरणने जोडण्या खंडित करण्याला सुरुवात केली आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून महावितरणचे जवळपास १० कोटी ५० लाख रुपये थकीत आहेत. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी थकीत बिले भरली नसल्याने वीजजोडणी खंडित होण्याची नामुष्की ओढवली आहे. तसेच पथदिव्यांचे ३३८ जोडणीची एकूण ३० कोटी थकबाकी असून चालू वर्षीचे १० कोटी येणे आहे. पैकी २५० पथदिव्यांचे कनेक्शन कट करण्यात आले आहे. ग्रामपंचायत व महावितरणच्या ओढाताणीचा दुहेरी फटका नागरिकांना बसत असून ऐन पावसाळ्यात गावांना तहानलेले व अंधारात राहण्याची वेळ आल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. शासनाच्या आदेशानुसार आम्ही काम करीत आहोत, बिल न भरल्यास वसुलीची मोहीम तीव्र करण्याचे संकेत महावितरणचे अभियंता रवींद्र गायकवाड यांनी दिले आहे. तर आ. बंब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

कोट...

वसुली नसल्याने ग्रामपंचायतीस वीजबिल भरण्यास अडचण येत आहे. महावितरणने टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिल्यास आम्ही थकबाकी भरण्यास तयार आहोत; परंतु एकरकमी निधी उपलब्ध नसल्याने अडचण येत आहे. यामध्ये मागील अनेक वर्षांपासूनच्या थकबाकीचा समावेश आहे.

- हिराबाई मोरे, सरपंच, पुरी

Web Title: MSEDCL shocks Gangapur gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.