साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:04 IST2021-05-13T04:04:26+5:302021-05-13T04:04:26+5:30
वैजापूर : वीजजोडणीचे काम करून देण्यासाठी साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास बुधवारी शहरातील मुरारी पार्क भागात रंगेहात ...

साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात
वैजापूर : वीजजोडणीचे काम करून देण्यासाठी साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञास बुधवारी शहरातील मुरारी पार्क भागात रंगेहात पकडण्यात आले. बाळनाथ निवृत्ती जोरे असे लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांची तालुक्यातील सटाणा शिवारात गट क्रमांक तीनमध्ये विहीर आहे. या विहिरीवर ७.५ एचपीची विद्युत जोडणी द्यावी, अशी मागणी तक्रारदार शेतकऱ्याने जोरे यांच्याकडे केली. मात्र, जोरे यांनी शासकीय फी सात हजार व लाचेची साडेतीन हजार रक्कम मिळून १०,५०० रुपयांची मागणी केली.
मात्र, तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्याआधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडित, पोलीस उपअधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर, कर्मचारी भीमराज जिवडे, रवींद्र काळे, भूषण देसाई, देवसिंग ठाकूर यांनी वैजापुरातील मुरारी पार्क भागात सापळा रचला. साडेतीन हजारांची लाच घेताना तंत्रज्ञ जोरे यास रंगेहात पकडले. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.