महावितरणला ६० लाखांचा फटका

By Admin | Updated: November 28, 2014 01:10 IST2014-11-27T23:59:38+5:302014-11-28T01:10:11+5:30

संजय कुलकर्णी , जालना जिल्ह्यात वीज गळतीचे प्रमाण २०-२२ टक्क्यांवर आल्याचा दावा वीज वितरण कंपनीकडून केला जात असला तरी केवळ आठ महिन्यात

MSEDCL hit Rs 60 lakhs | महावितरणला ६० लाखांचा फटका

महावितरणला ६० लाखांचा फटका


संजय कुलकर्णी , जालना
जिल्ह्यात वीज गळतीचे प्रमाण २०-२२ टक्क्यांवर आल्याचा दावा वीज वितरण कंपनीकडून केला जात असला तरी केवळ आठ महिन्यात या चोरीच्या प्रकारांमुळे महावितरणला ६० लाखांचा फटका सहन करावा लागत आहे. मात्र वीज चोरांमुळे एकीकडे लाखोंचे नुकसान सहन करणाऱ्या या कंपनीने एखाद्या ग्राहकाने देयकांचा भरणा करण्यास थोडाफार विलंब केला तरी त्याची वीज तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे.
जिल्ह्यात सध्या दुष्काळजन्य स्थिती आहे. मात्र या पूर्वीपासून ग्रामीण भागात सुमारे ४०० गावांमध्ये रोहित्रे जळालेल्या अवस्थेत असल्याने तेथे नवीन रोहित्रांची प्रतीक्षा आहे. रोहित्रांअभावी वीज पुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना पाणी असतानाही विद्युत पंपाद्वारे पिकांना पाणी देता येत नाही.
ज्या गावात रोहित्रे सुरू आहेत, पाणी देखील उपलब्ध आहे, अशा ठिकाणी महावितरणने आता देयकांच्या थकबाकीपोटी वीज तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे एकीकडे शेतकरी संकटात असताना आता महावितरणच्या लहरीपणामुळे ज्या भागात पाणी आहे, तो शेतकरी देखील संकटात सापडला, हे वास्तव आहे.
‘लोकमत’ ने २५ व २६ नोव्हेंबर रोजी स्टींग आॅपरेशनद्वारे शहरी भागात खुलेआम सुरू असलेल्या वीज चोरीचा पर्दाफाश केला. ही चोरी उघड करण्यात आम्ही असमर्थ असल्याचे वीज वितरण कंपनीतीलच काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
वीज वितरण कंपनीच्या पोलिस ठाण्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत वीज चोरी प्रकरणी १४३५ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. जालना शहरात १८२ तर तालुक्यात ५२१ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली. बदनापूर १२६, भोकरदन १३३, जाफराबाद ३५१, अंबड ३६३, परतूर ६७, घनसावंगी ३१७, मंठा तालुक्यात २११ प्रकरणे उघडकीस आली आहेत. वीज चोरी रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा मात्र महावितरणकडून केला जात आहे. ४
याबाबत अधीक्षक अभियंता बी.टी. पानढवळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, वीज गळतीचे प्रमाण जिल्ह्यात २० ते २२ टक्के आहे. परंतु हे प्रमाण आणखी कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. वीज चोरीच्या उघडकीस आलेल्या प्रकरणांमुळे ५९.३७ लाखांचे नुकसान कंपनीला गेल्या आठ महिन्यांमध्ये सोसावे लागले आहे. दंडाची रक्कम वसूल केली जात आहे, असेही पानढवळे यांनी सांगितले.

Web Title: MSEDCL hit Rs 60 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.