श्री तुळजाभवानी मातेच्या मोहनिद्रेस प्रारंभ
By Admin | Updated: December 23, 2014 00:00 IST2014-12-23T00:00:40+5:302014-12-23T00:00:40+5:30
तुळजापूर : ‘आई राजा उदो-उदो’चा गजर करीत व भंडाऱ्याची उधळण व संबळाच्या वाद्यात सोमवारी रात्री श्री तुळजाभवानीच्या ८ दिवसीय मोहनिद्रेस प्रारंभ झाला

श्री तुळजाभवानी मातेच्या मोहनिद्रेस प्रारंभ
तुळजापूर : ‘आई राजा उदो-उदो’चा गजर करीत व भंडाऱ्याची उधळण व संबळाच्या वाद्यात सोमवारी रात्री श्री तुळजाभवानीच्या ८ दिवसीय मोहनिद्रेस प्रारंभ झाला. ही निद्रा पौष दुर्गाष्टमी म्हणजेच २९ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत चालणार आहे.
तत्पूर्वी सकाळी चरणतीर्थ, अभिषेक, अलंकार पूजा हे विविध धार्मिक विधी पार पडले. दरम्यान, याचवेळी मंचकावरील गादीचा कापूस सेवेकरी पलंगे, निकते, कुलकर्णी, आराधी मंडळ यांनी वेचून त्यानंतर पिंजून नवीन गादी तयार करण्यात आली. सेवेकरी पलंगे यांनी चांदीचा पलंगगृह संपूर्णपणे पाण्याने स्वच्छ धुवून साफसफाई केली. त्यानंतर चांदीच्या पलंगावर नूतन तीन गाद्या व उच्च महावस्त्र अंथरण्यात आले. सायंकाळची नित्योपचार अभिषेक पूजा एक तास लवकर म्हणजे सहा वाजता सुरु करण्यात आली. या अभिषेक पूजेनंतर भोपी पुजाऱ्यांनी देवीस हळदीचा लेप लावला. तत्पूर्वी मंदिर संस्थान व भोपी पुजारी यांच्या आरत्या झाल्या. त्यानंतर श्री तुळजाभवानीस सिंहासनावरुन चांदीच्या पलंगावर निद्रेस आणण्यात आले. यानंतर अंगारा, धुपारती व नैवेद्य हे धार्मिक विधी पार पडले. यावेळी महंत चिलोजी बुवा, महंत तुकोजी बुवा, भोपी पुजारी, धिरज प्रकाश पाटील, डॉ. प्रशांत नारनवरे, संजय सोंजी, प्रकाश मलबा, प्रशांत सोंजी, प्रशांत पाटील, पवेकर महंत हमरोजी बुवा, पुजारी शाहुराज मगर, विकास शिंदे, दादासाहेब शिंदे, सेवेकरी लक्ष्मण पलंगे, नारायण पलंगे, भाऊसाहेब चोपदार, मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार सुजीत नरहरे, दिलीप नाईकवाडी, जयसिंग पाटील, आराधी, गोंधळी, सेवेकरी, भाविक आदी उपस्थित होते. मंदिर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देवीची मानाची आरती केली.४
श्री तुळजाभवानीच्या वर्षातून तीन विविध निद्रा होतात. यात पहिली निद्रा घोर, दुसरी श्रम तर तिसरी मोहनिद्रा होय. यातील घोर व मोह निद्रा या आठ दिवस तर श्रमनिद्रा पाच दिवस असे वर्षातून २१ दिवस तुळजाभवानी माता निद्रा करते. या काळात देवीस अभिषेक हा दही, दूधाऐवजी सुगंधी तेलाचा घातला जातो. या निद्राकाळात पुजारी वर्ग पलंगे, गादी, उशी, तक्या याचा त्याग करतात हे एका खास वैशिष्ट्य मानले जाते.