श्री गणरायाचे आज आगमन
By Admin | Updated: September 5, 2016 01:01 IST2016-09-05T00:39:59+5:302016-09-05T01:01:06+5:30
लातूर : आपल्या लाडक्या श्री गणरायाच्या स्वागताची श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर नगरीतील भाविकांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून,

श्री गणरायाचे आज आगमन
लातूर : आपल्या लाडक्या श्री गणरायाच्या स्वागताची श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर नगरीतील भाविकांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, शहरातील विविध ठिकाणी गणेश मंडळांकडून या गणरायाचे स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी रविवारी पूजेचे व आरासाचे साहित्य खरेदी करण्यासाठी लातूरच्या बाजारपेठेत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यंदाच्या गणेशोत्सवात विविध सामाजिक देखाव्यांवर मंडळांचा भर राहणार आहे.
लातूर शहरात ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल्स गेल्या आठ दिवसांपासून सजले आहेत. या स्टॉलवर गणेशमूर्तींच्या खरेदीसाठी भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. रविवारचा सुटीचा दिवस असल्याने बाजारपेठेत गणरायाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. यंदाच्या गणेशोत्सवात इको फ्रेंडली गणेशमूर्र्तींचे आकर्षण राहणार असून, समाजप्रबोधन, प्रदूषण आणि ध्वनीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनासह मंडळांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात एकूण १७१७ गणेश मंडळांकडून आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यातील ५८१ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी शांतता बैठकीच्या माध्यमातून घेतला आहे.