कव्हेकरांची चिंतनातून मोर्चेबांधणी
By Admin | Updated: May 29, 2014 00:33 IST2014-05-29T00:11:54+5:302014-05-29T00:33:38+5:30
लातूर : लोकसभेच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर शहर व लातूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची बुधवारी चिंतन बैठक घेतली़

कव्हेकरांची चिंतनातून मोर्चेबांधणी
लातूर : लोकसभेच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर शहर व लातूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची बुधवारी एमआयडीसीतील स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन स्कूलमध्ये चिंतन बैठक घेतली़ लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून लढण्याचे सुतोवाच या बैठकीतून देण्यात आले़ कार्यकर्त्यांनीही माजी आ़ कव्हेकर यांच्यावर अन्याय झाल्याचा सूर आळवला़ माजी आ़ कव्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत सोट, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रतिभा पाटील कव्हेकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, नगरसेविका वनिता काळे, बाबासाहेब कोरे, व्यापारी महासंघाचे दिनेश गिल्डा आदींची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी कार्यकर्त्यांनी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यावर काँग्रेसपक्षाकडून अन्याय झाल्याचा सूर आळवला. येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, त्याला कार्यकर्ते समर्थन देतील़ माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी कव्हेकरांना काँग्रेस पक्षात आणले़ त्यावेळी त्यांना लातूर ग्रामीणमधून तिकीट देण्याचे आश्वासन दिले असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखविले़ भागवत सोट, लक्ष्मण कांबळे, वनिता काळे, प्रतिभाताई पाटील, दिनेश गिल्डा आदींनी एका सुरात ही भुमिका मांडली़ काँग्रेस पक्षाने तिकीट न दिल्यास मुख्यमंत्री, पक्षश्रेष्ठींकडे शिष्टमंडळ जाईल. त्याउपरही तिकीट न दिल्यास अपक्ष म्हणून लढण्याची तयारी ठेवावी, अशी भूमीका कार्यकर्त्यांनी यावेळी मांडली. अन्न सुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना, राजीव गांधी निवारा योजना अशा अनेक योजना युपीए व आघाडी शासनाने गोरगरीबांच्या विकासासाठी आणल्या़ परंतु, या योजनांचा लाभ काँग्रेस पक्षाला होवू शकला नाही़ नेते, कार्यकर्ते शासनाने केलेल्या कामाच्या मार्केटींगमध्ये कमी पडले़ त्यामुळे काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला़ यातून सावरून पक्षाची भूमिका आणि दिशा ठरविण्याची गरज आहे़ त्यामुळेच लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली असल्याचे माजी आ़ कव्हेकर म्हणाले़ (प्रतिनिधी) लातूर शहरात पाण्याचा आणि कचर्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ नेतृत्वाकडे या प्रश्नाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी असायला हवी़ आपल्याकडे नेतृत्व असते तर पंधरा दिवसात कचरा, पाण्याचा प्रश्न सोडविला असता़ तशी धमक नेतृत्वात असण्याची गरज आहे, असे सांगत माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले, केंद्राच्या युपीए व राज्य शासनाच्या आघाडी शासनाने विकासाच्या अनेक योजना राबविल्या आहेत़ देशात आणि राज्यात विकासाचे विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत़ पण या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात सरकार अपयशी ठरले़ त्यामुळे काँग्रेस पक्षाचा पराभव झाला़ जनतेपर्यंत पोहोचण्यातच आपण कमी पडलो़ त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक स्तरावरही पराभवाला सामोरे जावे लागले आहे़ लातूर जिल्ह्याचे वेगळे स्थान... देश व महाराष्ट्रात जिल्ह्याला प्रतिष्ठा आहे़ मात्र त्यावर शिंतोडे उडविले जात आहेत़ त्यासाठी चांगले माणसे पुढे येण्याची गरज आहे़ लोकांच्या मनातील माणसांना पुढे केले पाहिजे़ विधानसभा विकासाचे केंद्र आहे़ त्या केंद्रात चांगलीच माणसे गेली पाहिजेत, असेही माजी आ़ कव्हेकर म्हणाले़