मोंढा स्थलांतराचे काम गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:46 IST2017-09-08T00:46:10+5:302017-09-08T00:46:10+5:30
जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा सभापती होताच मागील १९ वर्षांपासून प्रलंबित मोंढा स्थलांतरास सकारात्मक गती मिळाली आहे.

मोंढा स्थलांतराचे काम गतिमान
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा सभापती होताच मागील १९ वर्षांपासून प्रलंबित मोंढा स्थलांतरास सकारात्मक गती मिळाली आहे. या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी खुद्द विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी झालेल्या बैठकीत संचालक, व्यापारी प्रतिनिधींनी एकत्र बसून नियोजनबद्ध आखणी करून स्थलांतर करण्याचा संकल्प सोडला.
मागील आठवड्यात काँग्रेसचे संजय औताडे यांचा १३ विरुद्ध ४ मतांनी पराभव करीत भाजपचे राधाकिसन पठाडे हे कृउबा समितीचे सभापती झाले. मतदारसंघातील मोठी बाजार समिती ताब्यात आल्याने हरिभाऊ बागडे यांची जबाबदारी आणखी वाढली आहे.
गणेश विसर्जन होताच दुसºया दिवशी त्यांनी आपल्या कार्यालयात सभापती, संचालक, व्यापारी संचालक व मोंढ्यातील व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलविली. यासंदर्भात सभापती पठाडे यांनी सांगितले की, हरिभाऊ बागडे यांनी जाधववाडी बाजार समितीच्या विकासासाठी मोंढ्यातील व्यापाºयांचे नियोजनबद्ध पद्धतीने स्थलांतर करण्याचा निर्णय या बैठकीत
घेतला.
४१३ रुपये रेडिरेकनर दराप्रमाणे प्रस्ताव तयार करून तो पणन संचालकांना पाठविण्याचे आदेश दिले. यानुसार पुढील आठवड्यात बाजार समितीच्या संचालकांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. त्यात स्थलांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल व तो प्रस्ताव पुणे येथील पणन संचालकांकडे परवानगीसाठी पाठविण्यात येईल. त्यांनी बारा-एकची परवानगी देताच, त्यानुसार स्थलांतरासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात येतील. कारण, यासंदर्भात न्यायालयात याचिका आहे. न्यायालयाने आदेश देताच जाधववाडीतील होलसेल किराणा मार्केटसाठीच्या प्लॉटचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर एक वर्षाच्या आत व्यापाºयांनी दुकानाचे बांधकाम करून तेथे प्रत्यक्ष व्यवहार सुरू करावेत, असा निर्णय बैठकीत झाला. यास व्यापाºयांनीही सहमती दर्शविली. बैठकीत नगरसेवक राजू शिंदे, उपसभापती भागचंद ठोंबरे, संचालक दामोदर नवपुते, राम शेळके, रघुनाथ काळे, गणेश दहीहंडे, व्यापारी संचालक प्रशांत सोकिया, हरिशंकर दायमा, सचिव-विजय शिरसाठ, मोंढ्यातील व्यापारी प्रतिनिधी आनंद सेठी, देवेंद्रसेठ, संजय कांकरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
२३ एकर जमिनीसाठी न्यायालयात लढा
महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असणारी बाजार समिती म्हणून जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखल्या जाते. येथे बाजार समितीच्या नावावर १७५ एकर जमीन आहे. मात्र, त्यातील २३ एकर जमिनीचा वाद न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. सर्व्हे क्र. १०, १२ व १३ मधील मिळूनही २३ एकर जमीन पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी बाजार समितीला न्यायालयात लढा द्यावा लागत आहे.
आजघडीला बाजार समितीच्या २४ याचिका विविध न्यायालयात दाखल आहेत. यातील जमिनीच्या तीन याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेत. तर अन्य २१ याचिका उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहेत. बाजार समितीच्या हातातून गेलेली जमीन पुन्हा मिळविण्यासाठी नवनिर्वाचित सभापती व संचालक मंडळाला परिश्रम घ्यावे लागणार आहेत.