कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
By Admin | Updated: March 11, 2017 00:35 IST2017-03-11T00:29:08+5:302017-03-11T00:35:03+5:30
जालना :जिल्हा परिषदेच्या लेखा कर्मचारी संघटनने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर काळ्याफिती लावून आंदोलन केले.

कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
जालना : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लेखा कर्मचाऱ्यांना राजपत्रित दर्जा देण्यात यावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या लेखा कर्मचारी संघटनने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर काळ्याफिती लावून आंदोलन केले.
शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या ग्रेडपेच्या संदर्भात जि.प. कर्मचाऱ्यांबरोबर शासनाने दुजाभाव करून ग्रेड पे लागू केला नाही. याबाबत संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी न्यायालयात सुध्दा दाद मागितली होती. न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. न्यायालयीन नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन तत्कालीन ग्रामविकास मंत्र्यानी दिले होते. याला आत्ता २७ वर्षे होत असून, ते अद्यापही पूर्ण करण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांत संताप आहे. जि.प.च्या सहाय्यक लेखाधिकाऱ्याला राजपत्रितचा दर्जा देण्यात यावा यासाठी सुध्दा वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून मागणी केली. परंतु या मागणीकडे सुध्दा शासनाने दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे याबाबत न्यायालय आदेशालासुध्दा ग्रामविकास मंत्र्यालयाच्या अधिकाऱ्यांनी न जुमानता शासनाने त्यावर अभ्यासगट तयार करून ही मागणी नाकारल्याचे निवेदनात म्हटले आहे. नेमण्यात आलेल्या समितीने राजपत्रित दर्जा देण्याची आवश्यकता नाही अशी शिफारस केल्याने कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. राज्य कर्मचारी आणि जि.प. कर्मचारी यांचे पदोन्नतीचे पदे वेगवेगळी आहेत. राज्याला ८० जि.प. २० टक्के पदोन्नती आहे. यात वाढ करून कर्मचाऱ्यांना समसमान पदोन्नती देण्याची सुध्दा मागणी यावेळी करण्यात आली. अंशदायी पेन्शन योजना बंद करून नियमित पेन्शन योजना लागू करावी, ग्रामीण हमी योजना व इंदिरा आवास योजना अंतर्गत पंचायत स्तरावर सहाय्यक लेखाधिकारी पद निर्माण करणे, जि.प. लेखा संवर्गीय कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लेखाधिकारी तसेच सहाय्यक लेखाधिकारी या पदावर पदोन्नती देण्यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रशिक्षण देण्यात यावे, जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालयाप्रमाणे पंचायत समितीस्तरावर लेखा विभागाचे कामकाज करण्यात यावे, तसेच पंचायत समितीस्तरावर सहाय्यक लेखाधिकारी यांना विशेष वित्तीय अधिकार देण्यात यावेत, वित्तीय व लेखा सेवा वर्ग ३ ची परीक्षा दरवर्षी नियमित घेण्यात यावी, कर्मचाऱ्यांचे जॉब कार्ड तयार करावे, पंचायत स्तरावर लेखाधिकारी वर्ग २ चे पद निर्माण करण्यात यावे आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमारे काळ्या फिती लावून आंदोलन केले.
निवेदनावर लेखा कर्मचारी संघटनचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, सचिव गजानन मगर, रामेश्वर चव्हाण, इकबाल सिद्दीकी, दीपक जोशी, रवि कोरडे, रवि बोर्डे, शेख हारूण आदी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.