अध्यक्षांविरुद्ध ‘अविश्वासा’च्या हालचाली

By Admin | Updated: December 1, 2015 00:30 IST2015-12-01T00:28:01+5:302015-12-01T00:30:29+5:30

विजय सरवदे ,औरंगाबाद विद्यमान जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत सर्वपक्षीय नाराज सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करण्याची व्यूहरचना आखली आहे.

Movement of 'Unbelief' against the President | अध्यक्षांविरुद्ध ‘अविश्वासा’च्या हालचाली

अध्यक्षांविरुद्ध ‘अविश्वासा’च्या हालचाली


विजय सरवदे ,औरंगाबाद
विद्यमान जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत सर्वपक्षीय नाराज सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करण्याची व्यूहरचना आखली आहे. दरम्यान, या खेळीमध्ये काही काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यदेखील आघाडीवर आहेत. मात्र, यासंबंधी मात्र ते उघडपणे बोलत नाहीत. तब्बल सव्वा वर्ष आमचीच नव्हे तर अन्य कोणत्याही पक्षाच्या सदस्यांची कामे झालेली नाहीत, त्यामुळे आता महाजन यांना हटवणे हाच आमच्यासमोर पर्याय आहे, असा निर्धार स्वपक्षीय सदस्यांनी केला आहे.
सध्या जिल्हा परिषदेत वरकरणी सर्व आलबेल असल्याचे चित्र दिसत असले तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे, असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेच्या काही सदस्यांनी सदर प्रतिनिधीजवळ बोलून दाखविले.
काँग्रेसच्या एका ज्येष्ठ सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर जि.प. अध्यक्षांविरुद्धची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, जि.प.मध्ये ६० सदस्य निवडून आलेले आहेत. यातील ५-१० सदस्य सोडले तर उर्वरित सर्वच पक्षांचे सदस्य अध्यक्ष यांच्या कारभारावर कमालीचे नाराज आहेत. त्यांनी सव्वा वर्षाच्या कार्यकाळात कोणाचेही काम केलेले नाही.
दोन-तीन दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार जिल्हा परिषदेत आले होते. जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अँटीचेंबरमध्ये विविध पक्षांच्या मोजक्या सदस्यांसोबत ते गप्पा मारत बसले तेव्हा त्यांनी जिल्हा परिषदेत अध्यक्षांविरुद्ध सुरू असलेल्या घडामोडींचा अंदाज घेत ‘महाजन तुम्ही सक्रिय व्हा, अन्यथा काहीही होऊ शकते’, असा सूचक सल्ला दिला होता.
दरम्यान, सध्याची परिस्थिती बघता काँग्रेसला खांदेपालट करण्याचा निर्णय परवडणारा नाही. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे किंवा आ. अब्दुल सत्तार हे सध्या तरी अध्यक्ष बदलण्याच्या ‘मूड’मध्ये नाहीत, याचा अंदाज आल्यामुळे काँग्रेस सदस्यांमध्ये असंतोष उफाळला आहे. वेळप्रसंगी शिवसेनेने यासंबंधी पुढाकार घेतल्यास त्यांना उघडपणे पाठिंबा देण्याची तयारी काही काँग्रेस सदस्यांनी दाखवली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या एका माजी आमदाराने यासंबंधी चाचपणी केली असून, अध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेना सदस्य संतोष माने, दीपक राजपूत आणि मनाजी मिसाळ या तीन सदस्यांपैकी एकाला उतरवण्याची तयारी दर्शवली. मात्र, पालकमंत्री रामदास कदम यांच्यासोबत चर्चा करून अविश्वास ठराव आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, सेनेने अविश्वास ठराव आणून अध्यक्ष बनण्यासाठी भूमिका घेतल्यास आम्ही सेनेत प्रवेश करू, असा निर्णय मनसेच्या ‘त्या’ ५ सदस्यांनी बोलून दाखविला आहे. विशेष म्हणजे, ते पाचही सदस्य काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवरही जाऊन आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Web Title: Movement of 'Unbelief' against the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.