स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलसमोर धरणे आंदोलन
By Admin | Updated: June 10, 2014 00:54 IST2014-06-10T00:08:04+5:302014-06-10T00:54:14+5:30
परंडा : रब्बीचे दुष्काळी व गारपिटीची मदत तात्काळ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलसमोर धरणे आंदोलन
परंडा : तालुक्यातील वगळलेल्या गावांतील शेतकऱ्यांना रब्बीचे दुष्काळी व गारपिटीची मदत तात्काळ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे मराठवाडा संघटक गोरख भोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. गेल्या चार पाच वर्षांपासून परंडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण झालेले आहेत. त्यातच अचानक आलेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागासह रबीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने यासबंधी समक्ष पाहणी करुन पंचनामे करत मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र, परंडा तालुक्याच्या महसूल विभागाने मर्यादीत गावातील नुकसानीचेच पंचनामे करून मदतीचे वाटप केले. त्यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहिल्याचा आरोप संघटनेने केला आहे. वगळण्यात आलेल्या गावांचा पुन्हा यादीत समावेश करुन मदत द्यावी, अशी मागणीही संघटनेने यावेळी केली.
तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावच धरणे आंदोलन सुरु केल्याने कार्यालयात जाण्या-येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. यावेळी सघंटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजीही केली. दरम्यान, प्रभारी तहसीलदार एस. एस. पाडळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून मराठवाडा संघटक गोरख भोरे यांच्याशी चर्चा केली. मात्र, ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. अखेर पाडळे यांनी भ्रमणध्वनीवरून वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर अनुदान देण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास खोसरे, शिवानंद तळेकर, शकंर तिंबोळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)