आंदोलनाने दिला नेतृत्वाला आयाम
By Admin | Updated: May 17, 2014 00:21 IST2014-05-16T22:52:45+5:302014-05-17T00:21:39+5:30
लातूर : रामविलास पासवान यांचा देशभरात झंझावात सुरु झाला होता़ जनता दल आणि दलित सेनेच्या माध्यमातून दलित सेनेच्या गाव तेथे शाखा सुरु झाल्या होत्या़

आंदोलनाने दिला नेतृत्वाला आयाम
लातूर : रामविलास पासवान यांचा देशभरात झंझावात सुरु झाला होता़ जनता दल आणि दलित सेनेच्या माध्यमातून दलित सेनेच्या गाव तेथे शाखा सुरु झाल्या होत्या़ पासवानांच्या या हाकेला मराठवाड्यात लातुरातून सर्वप्रथम डॉ़ सुनील गायकवाड यांनी साथ दिली आणि पासवान यांच्या दलित सेनेत ते दाखल झाले़ जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्याला प्रारंभ झाला़ दिल्लीतील मोर्चा असो की, महाराष्ट्रातील वेगवेगळे आंदोलने असो, त्याचे नेतृत्व डॉ़ गायकवाड यांनी केले आहे़ येथूनच त्यांचा राजकारणातही वावर सुरु झाला़ दरम्यान, पुढे जनता दलाचे तुकडे झाले़ त्यामुळे डॉ़ सुनील गायकवाड यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला होता़ जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून या पक्षातही ते काही काळ वावरले़ परंतु, तेथे रमले नाहीत़ त्यातच चळवळीही क्षीण झालेल्या़ पक्षीय राजकारणात राहण्याची इच्छाशक्ती आणि राजकारणातील मुख्य पदाचा दावेदार होण्याचे स्वप्न सुनीलचे दांडगेच़ त्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला़ गेल्या १० वर्षांपासून ते भारतीय जनता पार्टीत सक्रिय आहेत़ प्रदेश कार्यकारिणीत त्यांचे मोठे स्थान आहे़ त्यामुळे त्यांना २००९ मध्ये भारतीय जनता पार्टीने लातूर लोकसभेसाठी पहिल्यांदा उमेदवारी दिली़ नवखा उमेदवार, कसलीच पार्श्वभूमी नसलेला, राजकारणाचा गंध नसलेला म्हणून विरोधकांनी त्यांना हिनवले़ पण जनताजनार्धनाने या निवडणुकीतही त्यांना डोक्यावर घेतले़ निसटत्या मताने अवघ्या सात-सव्वासात हजार मतांनी त्यांचा पराभव झाला़ हा पराभव खुल्या दिलाने स्वीकारून सुनील गायकवाड यांनी पक्ष कार्यात वाहून घेतले़ लातूर लोकसभा मतदारसंघात गावोगावी भटकंती सुरुच ठेवली़ गेली ५ वर्षे पायात भिंगरी बांधून हा माणूस गावागावात जाऊन प्रश्न समजून घेत होता़ इकडे २०१४ च्या निवडणुका जाहीर झाल्या़ तिकिटासाठी स्पर्धा लागली़ वीसएक स्पर्धेत़ तरीही तिकिट मिळविण्यात ते यशस्वी झाले आणि गेली पाच वर्षे भटकंती केल्याचा फायदा झाला़ जनताजनार्दनाने पुन्हा डोक्यावर घेतले आणि ते यावेळी खासदार झाले़