प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन
By Admin | Updated: June 29, 2016 01:08 IST2016-06-29T00:31:25+5:302016-06-29T01:08:44+5:30
औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना वेठीस धरणारा प्रकल्प म्हणजे समांतर जलवाहिनी होय. मनपा प्रशासनाने ३० जून रोजीच्या सर्वसाधारण

प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन
औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना वेठीस धरणारा प्रकल्प म्हणजे समांतर जलवाहिनी होय. मनपा प्रशासनाने ३० जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत कंत्राटदाराची हकालपट्टी करा असा प्रस्ताव ठेवला आहे. नगरसेवकांनी हा प्रस्ताव मंजूर न केल्यास शहरात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा प्रा. विजय दिवाण यांनी दिला.
समांतर पाणीपुरवठा खासगीकरणविरोधी नागरी कृती समितीचा मेळावा मंगळवारी भानुदासराव चव्हाण सभागृहात घेण्यात आला. यावेळी कृती समितीचे सदस्य एच.आर. ठोलिया, प्रदीप पुरंदरे, कलीम अख्तर, मुळावे, विजय सिरसाट, आचार्य यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. दिवाण यांनी सांगितले की, शहरातील पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करण्याचे पाप शिवसेना-भाजप युतीने केले. खाजगीकरणातून हा प्रकल्प उभा राहिल्यास सर्वसामान्य नागरिकांना तो अजिबात परवडणार नाही. दरवर्षी ६९ हजार रुपये प्रत्येक नागरिकाला मोजावे लागतील. पगारापेक्षा पाणीपट्टी जास्त अशी वेळ निर्माण होईल. खाजगीकरणाच्या माध्यमातून नागरिकांना हा बोजा लादण्यात येत असतानाही सर्वसामान्य नागरिक या मुद्यावर बोलायला तयार नाही. आपण कोणाला घाबरतो असा प्रश्नही दिवाण यांनी उपस्थित केला.
नगरसेवकांनी हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवकांनी प्रकल्प रद्द न करता तो सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला तर समांतरविरोधी आंदोलनाला लोकक्षोभाचे रूप द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी विजय सिरसाट, मुळावे, पुरंदरे, प्रभाकर चौधरी, अण्णासाहेब खंदारे, रमेशभाई खंडागळे, होनकळसे, डॉ. भालचंद्र कानगो यांनीही मनोगत व्यक्त केले.
उद्या धरणे आंदोलन
समांतर जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात गुरुवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर मनपा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय मेळाव्यात जाहीर करण्यात आला. सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात होईल.