जिल्ह्याची शैक्षणिक चळवळ गतिमान
By Admin | Updated: December 28, 2016 00:02 IST2016-12-28T00:01:45+5:302016-12-28T00:02:18+5:30
बीड : जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळ गतिमान झाल्याचे गौरवोद्गार जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी काढले.

जिल्ह्याची शैक्षणिक चळवळ गतिमान
बीड : जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेल्या परिस्थितीत जिल्ह्यात ८१ शाळा, तीन गटशिक्षणाधिकारी कार्यालये व जिल्हा स्काऊट गाईड अशी चार कार्यालये आयएसओ नामांकन मिळवितात ही मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळ गतिमान झाल्याचे गौरवोद्गार जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी काढले.
येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवारी आयएसओ मानांकन प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, संबंधित गावचे सरपंच, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांच्या गौरवार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण सभापती महेंद्र गर्जे, समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे, जि.प. सदस्य देवीदास धस, मोहन मुंडे, जिल्हा स्काऊट आयुक्त संतोष मानूरकर, डाएटचे प्राचार्य विनोद देवगावकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी (निरंतर) विक्रम सारुक, उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, फातेमा अस्करी, उस्मानी नजमा, राहुल दुबाले यांची मंचावर उपस्थिती होती.
अध्यक्ष पंडित म्हणाले, आयएसओ मिळविण्यासाठी शाळांना ४६ निकष पूर्ण करावे लागतात. मात्र, ८१ शाळांनी हा अवघड डोंगर सर करुन आयएसओचा मान मिळविला. जिल्ह्यातील अनेक शाळांत इंग्रजी शाळांना लाजेवल असे ज्ञानदान केले जात आहे. लोकसहभागातून कोट्यवधी रुपये जमा झाले. अनेकांनी स्वत:ची जमीन शाळांसाठी दान दिली. हा एकत्रित आकडा ४० कोटींच्या घरात आहे. यातून कामाची पावती मिळाल्याचेही ते म्हणाले. अडीच वर्षांच्या कार्यकाळात गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले. त्याला पदाधिकाऱ्यांबरोबरच अधिकारी- कर्मचारी , शिक्षक व ग्रामस्थांनी भरभरून साथ दिली. त्यामुळेच हे सारे शक्य झाले असेही त्यांनी सांगितले. अनेक शाळांना हक्काची इमारत नाही. कुठे पडझड झालेली आहे. त्यासाठी निधी खेचून आणण्याकरता वैयक्तिक पाठपुरावा केला; परंतु त्यात अपेक्षित यश मिळाले नाही, असा खेद त्यांनी व्यक्त केला. स्वच्छतेत पिछाडीवर असलेला जिल्हा आज राज्यात तिसऱ्यास्थानी आहे.
शिक्षणातही दर्जात्मक सुधारणा घडत आहे. हा प्रगतीचा आलेख वाखाणण्याजोगा आहे, असे ते म्हणाले.
जि.प. सदस्य देवीदास धस म्हणाले, शिक्षकांना लोकांची साथ मिळाली तर ते उत्तम काम करु शकतात. जामगाव या आपल्या गावच्या शाळेत हा बदल घडवून आणला आहे. याशिवाय आष्टी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये चांगले शैक्षणिक वातावरण बनले आहे. मात्र, आष्टीला केवळ ५ शाळा आयएसओ मानांकनास पात्र ठरल्या अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे यांनी सांगितले की, ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ रुजते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. येत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगून ते म्हणाले तांत्रिक शिक्षण हा रोजगार प्राप्तीचा उत्तम मार्ग आहे. भविष्यात जिल्ह्यातील सर्वच्या सर्व २५१७ प्राथमिक व ६८ माध्यमिक शाळा आयएसओ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयएसओप्राप्त शाळांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यावेळी सन्मानीत करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जी. एन. चोपडे यांनी केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)