कोविडमध्ये आंदोलन ; कराड, बागडे, सावेसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:04 IST2021-05-07T04:04:26+5:302021-05-07T04:04:26+5:30
भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर, खा. डाॅ. भागवत कराड, आ. हरीभाऊ बागडे, आ. अतुल सावे, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ...

कोविडमध्ये आंदोलन ; कराड, बागडे, सावेसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर, खा. डाॅ. भागवत कराड, आ. हरीभाऊ बागडे, आ. अतुल सावे, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर, बापू घडामोडे, प्रमोद राठोड, भावराव देशमुख, राजेश मेहता, शेख हबीब, धनंजय पालोदकर, सविता कुलकर्णी या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तेथे हिंसाचार उसळला आहे. पश्चिम बंगालात सत्तेवर आलेल्या टीएमसी पक्षाने हा हिंसाचार घडविला असून त्यात भाजपाचे समर्थक व पदाधिकारी बळी पडले आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे. या हिंसाचाराच्या निषेधार्थ शहर भाजपतर्फे बुधवारी (दि.५) सकाळी उस्मानपुरा येथील पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. शहरात कोविड संसर्ग वाढत असून त्याला रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी लागू असल्यामुळे कोणत्याही आंदोलनाला परवानगी नाही. असे असताना भाजपने हे आंदोलन केले. हवालदार मोतीलाल गायकवाड यांनी वेदांतनगर ठाण्यात सरकारतर्फे तक्रार देऊन गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राहुल भदरगे हे तपास करीत आहेत.