३ मुलींचा खून करून मातेची आत्महत्या
By Admin | Updated: May 27, 2016 00:07 IST2016-05-26T23:51:07+5:302016-05-27T00:07:15+5:30
औरंगाबाद : दोन मुलींच्या पाठोपाठ तिसरीही मुलगी झाली अन् मग वंशाला दिवा दिला नाही म्हणून सुरू झाला सासरच्या मंडळींकडून छळ... त्यातच सासरच्यांनी माहेराहून पैसे आणण्यासाठी सातत्याने तगादा लावला.

३ मुलींचा खून करून मातेची आत्महत्या
औरंगाबाद : दोन मुलींच्या पाठोपाठ तिसरीही मुलगी झाली अन् मग वंशाला दिवा दिला नाही म्हणून सुरू झाला सासरच्या मंडळींकडून छळ... त्यातच सासरच्यांनी माहेराहून पैसे आणण्यासाठी सातत्याने तगादा लावला. पैसे आणत नाही म्हणून छळात अधिक भर पडली. अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हा छळ असह्य झाल्याने ‘तिने’ अखेर छळातून सुटका करून घेण्यासाठी इहलोकातूनच मुक्ततेचा मार्ग निवडला; परंतु आपल्या पश्चात मुलींचे काय? या चिंतेने ‘तिला’ ग्रासले. शेवटी हृदयावर दगड ठेवून पोटच्या तिन्ही चिमुकल्या मुलींना स्वत:च्या हाताने मृत्यूच्या तोंडी देत ‘तिने’ही गळफास घेत जीवनयात्रा संपविली...
अंगावर शहारे आणणारी ही हृदयद्रावक घटना रेल्वेस्टेशन परिसरातील राहुलनगर येथे गुरुवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. राधा संतोष त्रिभुवन (२४) अशी आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. राजनंदिनी (७), कोमल (४) आणि प्रांजल (२) अशी खून करण्यात आलेल्या चिमुकल्या मुलींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, राधा आणि संतोष त्रिभुवन यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला. राहुलनगर येथे पती, सासू कमल, सासरा किसन, भाया अशोक, जाऊ वर्षा यांच्यासह संयुक्त कुटुंबात ती राहत होती. त्यांच्या घरात दहा बाय दहाच्या दोन खोल्या आहेत. एका खोलीत संतोष पती-पत्नी आणि तीन मुली तर दुसऱ्या खोलीत अशोकचे कुटुंब राहत असे. छोटा हत्ती या मालवाहू गाडीचा चालक- मालक असलेला संतोष हा बुधवारी सकाळी मढी (जि.अहमदनगर) येथे भाडे घेऊन गेला होता. बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन्ही जावांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर रात्री दोघीही त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या. राधा ही आपल्या तिन्ही मुलींसह एका खोलीत झोपली होती. गुरुवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास वाड्यातील संडास, बाथरूममध्ये राधा गेली. काही वेळानंतर सासू कमल झोपेतून उठली. कमलला शौचालयास
जायचे असल्याने राधा बाहेर येण्याची वाट पाहत बसली. बराच वेळ झाला तरी राधा शौचालयातून बाहेर येत नसल्यामुळे कमल यांनी राधाला आवाज दिला. मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची सून वर्षा आणि मुलगा अशोक यास उठविले. त्यांनी शौचालयाच्या दरवाजाची कडी हात घालून उघडली तेव्हा राधाने शौचालयाच्या छताला दोरी बांधून गळफास घेतल्याचे आढळले. त्यांनी तिला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा
शवविच्छेदनानंतर राधाची आई शोभा जाधव यांनी सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राधाचा पती संतोष त्रिभुवन, सासू कमलबाई, सासरा किसन, भाया अशोक त्रिभुवन, जाऊ वर्षा आणि नंदई संजीव भुसाळे (रा. राहुलनगर) यांच्याविरुद्ध छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सातारा ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले.
राधाला माहेरी पाठविले असते तर.....
राधा हीस माहेरी पाठविण्यास तिचा पती आणि सासू, सासऱ्याकडून सतत विरोध होत असे. रविवारी २२ मे रोजी राधाची आई शोभा जाधव या राधाला माहेरी घेऊन जाण्यासाठी राहुलनगर येथे आली होती. संतोषने राधाला माहेरी पाठविण्यास नकार दिला. शिवाय तिच्या सासूनेही शोभाबाई यांच्याशी गोड बोलून त्यांना परत पाठविले. राधा जर रविवारी माहेरी गेली असती तर आजची घटना घडली नसती, अशी चर्चा तिचे नातेवाईक घाटी रुग्णालयात करीत होते.
रात्री दहा वाजता आईला म्हणाली तू जेवली का...
बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास राधाने आईला फोन केला होता. यावेळी तिने तू जेवलीस का, असे विचारले. त्यानंतर तिने फोन ठेवून दिला. आईसोबत तिचे ते शेवटचे बोलणे झाले. राधा हीस एक मोठा भाऊ आणि बहीण आहे.
अन् तिन्ही मुली झोपेतून उठल्याच नाही
तिकडे फाशी घेतलेल्या राधाला फासावरून उतरवून घाटीत नेल्यानंतर जाऊ वर्षा आणि ननंद सुनीता यांनी राधाच्या खोलीकडे धाव घेतली. खोलीचा दरवाजा नुसता लोटलेला होता. दरवाजा उघडताच राधाशिवाय एक क्षणही न राहणाऱ्या तिच्या तिन्ही मुली अंथरूनावर निपचित पडलेल्या या दोघींना दिसल्या. दोघींनी राजनंदिनी, कोमल आणि प्रांजल या तिघींना हालवून उठवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या उठल्या नाहीत. तेव्हा या तिघींचाही मृत्यू झालेला असल्याचे लक्षात आले. तातडीने नातेवाईकांनी दुसरी रिक्षा बोलावून तिन्ही चिमुरड्यांना घाटी रुग्णालयात आणले. तपासणीत या तिन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचे अपघात विभागातील डॉक्टरांनी घोषित केले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळास भेट
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त रविकांत बुवा, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती, मधुकर सावंत, सहायक निरीक्षक उन्मेष थिटे, गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक अमित बागूल आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
राधा व तिच्या तिन्ही मुली राजनंदिनी, कोमल आणि प्रांजल यांचे दुपारी घाटीत रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी राधाचा मृत्यू फाशी घेतल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. तर या तिन्ही चिमुकल्यांचा मृत्यू हा श्वास गुदमरल्याने झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. मात्र, अचूक निदानासाठी तिघींचाही व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
...त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि नंतर राधाने स्वत: फाशी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, शवविच्छेदनानंतर गंगापूर तालुक्यातील मुरमी या राधाच्या माहेरी चौघींवर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात जेव्हा ‘त्या’ चौघींचे प्रेत आणण्यात आली. त्यावेळी तेथे असलेल्या सासरच्या मंडळींना राधाच्या माहेरच्या संतप्त मंडळींनी असे झोडपले.
या घटनेची माहिती मिळताच राधाची आई शोभा, वडील गौतम, भाऊ सतीश आणि अन्य नातेवाईक मुरमी (ता. गंगापूर) येथून घाटी रुग्णालयात दाखल झाले. राधाचा सासरच्या मंडळींकडून कसा छळ करण्यात येतो, याची माहेरच्यांना कल्पना होती. त्यामुळे माहेरच्या मंडळींच्या संयमाचा बांध फुटला अन् शवागृहाच्या आवारात असलेल्या राधाच्या सासरच्या मंडळींना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे घाटीतील शवविच्छेदनगृहासमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता. राधा आणि तिच्या तिन्ही चिमुकल्यांची सासरच्या मंडळींनी हत्या केली, असा आरोप मंडळी करीत होती. माझ्या मुलीच्या आणि नातींच्या जिवाच्या बदल्यात आम्ही तीन जीव घेणार असे ते म्हणत होते. याप्रसंगी पोलिसांनी तात्काळ राधाच्या सासरच्या मंडळींना जीपमधून ठाण्यात नेले.
राधाला लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांपासून सासरची मंडळी पैशासाठी त्रास देत होती. त्यामुळे छोटा हत्ती ही गाडी घेण्यासाठी माहेरच्या लोकांनी राधाच्या नवऱ्याला एक लाख रुपये दिले होते. त्यानंतरही त्यांच्याकडून अधूनमधून पैशांची मागणी होत होती.
पाठोपाठ पहिल्या दोन मुलींना जन्म दिल्यानंतर तिचा त्रास वाढला होता. पती तिला बेदम मारहाण करायचा. त्यामुळे तिने पतीसह सासरच्या मंडळीविरोधात तीन वर्षांपूर्वी महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल केली होती.
याप्रसंगी तिच्या नंदई आणि अन्य नातेवाईकांनी यापुढे तुला कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी घेतल्याने ती नांदावयास गेली. त्यानंतर तिने तिसऱ्या मुलीस जन्म दिला आणि तिच्या त्रासात अधिक भर पडल्याचे राधाच्या आईने सांगितले.