ताटातूट झालेल्या बाळाला पाहून आईचा आनंद गगनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:02 IST2021-08-24T04:02:27+5:302021-08-24T04:02:27+5:30

: दोन दिवसांपूर्वी जन्मदात्याने केले होते अपहरण वाळूज महानगर : जन्मदात्यानेच अपहरण केलेला काळजाचा तुकडा दुसऱ्या दिवशी रविवारी सुखरूप ...

Mother's happiness skyrockets when she sees a divorced baby | ताटातूट झालेल्या बाळाला पाहून आईचा आनंद गगनात

ताटातूट झालेल्या बाळाला पाहून आईचा आनंद गगनात

: दोन दिवसांपूर्वी जन्मदात्याने केले होते अपहरण

वाळूज महानगर : जन्मदात्यानेच अपहरण केलेला काळजाचा तुकडा दुसऱ्या दिवशी रविवारी सुखरूप मिळाल्याने चिमुकल्याला कवेत घेत सद्गदीत आईला पोलिसांचे कोणत्या शब्दांत आभार मानावेत हे तिला कळेना. आईपासून ताटातूट झालेला तीन महिन्यांचा चिमुकला परत मिळाल्याने अखेर अपहरण नाट्यावर पडदा पडला.

रांजणगावात दोन दिवसांपूर्वी संदीप कदम याने पत्नी अपर्णा हिला मारहाण करून तीन महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन तो फरार झाला होता. जन्मदात्यानेच पोटचा गोळा पळविल्यामुळे बाळाच्या विरहाने आई अपर्णा व्याकूळ झाली होती. तिने एमआयडीसी वाळूज ठाणे गाठून घडलेली घटना कथन केली. पती संदीप हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, तो चिमुकल्या सिद्धार्थचे काही तरी बरे-वाईट करील, या भीतीने पोलिसांना बाळ परत आणून देण्याची विनवणी केली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सहायक निरीक्षक एम.आर. घुनावत, उपनिरीक्षक राहुल निर्वळ यांना तत्काळ संदीपचा शोध घेण्याचे आदेश बजावले होते. पोलिसांचे एक पथक अहमदनगरच्या दिशेने रवाना करण्यात आले होते.

सिद्धार्थचे अपहरण केल्यानंतर संदीप हा अहमदनगरच्या दिशेने निघून गेला होता. मोबाइल लोकेशनवरून संदीप हा करमाळा परिसरात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचे पथक त्याच्या मागावर गेले. दरम्यान, पोलीस आपला पाठलाग करीत असल्याची कुणकुण लागताच संदीप तेथून माघारी फिरला. रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास संदीप सिद्धार्थला घेऊन पंढरपुरात आला. ही बाब त्याने रांजणगावात राहत असलेल्या मामाला सांगितली. त्यानंतर मामा व अपर्णा हिची आजी शोभाबाई वाकचौरे हे दोघे पंढरपूरला आल्यानंतर त्याने सिद्धार्थला त्यांच्या स्वाधीन केले व फरार झाला.

बाळाच्या शोधार्थ पोलीस पथकासोबत गेलेल्या अपर्णा यांना आपला चिमुकला सुरक्षित असल्याची माहिती मिळताच तिने सुटकेचा नि:श्वास सोडला. अपर्णा व तिची आई सुजाता गाडेकर या दोघी रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेल्या. संपूर्ण दिवस-रात्र चिमुकल्यापासून दूर राहिलेल्या अपर्णाने सिद्धार्थला कवटाळून घेत अश्रूला वाट मोकळी करून दिली.

फोटो ओळ- पतीने अपहरण केलेला काळजाचा तुकडा सुखरूपपणे परत मिळाल्याने आई अपर्णा हिने बाळाला कवेत घेत अश्रूला वाट मोकळी करून दिली.

फोटो क्रमांक- आई व बाळ

------------------

Web Title: Mother's happiness skyrockets when she sees a divorced baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.