दहा महिन्यांच्या तान्हुल्याची आई कालव्यात वाहून गेली
By | Updated: December 4, 2020 04:14 IST2020-12-04T04:14:46+5:302020-12-04T04:14:46+5:30
पैठण : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या प्रवाहात गुरुवारी दुपारी तालुक्यातील तुळजापूर येथील २१ वर्षीय विवाहिता वाहून गेली आहे. रात्री ...

दहा महिन्यांच्या तान्हुल्याची आई कालव्यात वाहून गेली
पैठण : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या प्रवाहात गुरुवारी दुपारी तालुक्यातील तुळजापूर येथील २१ वर्षीय विवाहिता वाहून गेली आहे. रात्री उशिरापर्यंत सदर महिलेचा कालव्यात शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र, यश आले नाही. रेखा अक्षय सोनवणे असे विवाहितेचे नाव असून तिला दहा महिन्यांचे बाळ असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डाव्या कालव्यात सध्या जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू आहे. सिंचनासाठी पाणी ओढण्यासाठी तुळजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी कालव्या विद्युत पंप सोडलेले आहे. विद्युत पंप सुरू करताना पंपात पाणी भरावे लागते. पंपात पाणी भरण्यासाठी कालव्यातून बकेटने पाणी काढताना रेखा सोनवणे यांचा तोल गेला आणि त्या कालव्यात पडल्या. कालव्यातून १२०० क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू असल्याने गतिमान प्रवाहात त्या वाहून गेल्या. परिसरातील ग्रामस्थांनी कालव्यात उड्या मारून वाहून जात असलेल्या महिलेचा पाठलाग केला; परंतु यश आले नाही. दोन किलोमीटर अंतरावर सदर महिलेची पाण्याची बकेट हाती लागली असल्याचे माजी सभापती सुरेश दुबाले यांनी सांगितले. पैठण पोलिसांच्या मदतीने ग्रामस्थ सदर महिलेचा शोध घेत आहेत. मात्र, उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.
चौकट
बाळाचे मातृछत्र हरवले
रेखा सोनवणे या शेतकरी महिलेला दहा महिन्यांचे बाळ असून पतीला मदत व्हावी म्हणून ती कालव्यावरील मोटारीत पाणी भरीत होती. पती अक्षय सोनवणे शेतात मोटर सुरू होण्याची वाट पाहत होते. मात्र, नियतीने घात केला आणि रेखा कालव्यात पडून वेगवान प्रवाहासोबत वाहून गेल्या. दहा महिन्यांचा चिमुकल्याचे मातृछत्र हरवल्याने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.