आईला जाळलेल्या बापाला भेटण्यास चिमुकल्यांचा नकार
By Admin | Updated: July 26, 2016 00:11 IST2016-07-26T00:05:33+5:302016-07-26T00:11:22+5:30
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे पतीने जाळलेल्या शांताबाई जाधव या ३५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

आईला जाळलेल्या बापाला भेटण्यास चिमुकल्यांचा नकार
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे पतीने जाळलेल्या शांताबाई जाधव या ३५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे चार चिमुकली मुले पोरकी झाली आहेत. विशेष म्हणजे या चिमुकल्यांनी आईला जाळलेल्या आपल्या वडिलांना अंत्यसंस्काराच्या वेळी भेटण्यासही नकार दिला.
वडगाव कोल्हाटी येथे राहत असलेल्या अशोक जाधव याने संशयावरून पत्नी शांताबाईला पेटवून दिले. रविवारी मध्यरात्री शांताबाईचा मृत्यू झाला. त्यांना जवळचे कोणी नातेवाईक नसल्याने सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी पंचशील महिला बचत गटाच्या मदतीने बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. यावेळी शांताबाईची १० वर्षीय मुलगी राणी व ७ वर्षीय मुलगा दत्तू यांना पोलिसांनी आईचे अखेरचे दर्शन घडविले. आणखी दोन मुली अगदीच लहान आहेत. यावेळी या चिमुकल्यांची अवस्था पाहून पोलिसांसह उपस्थित सर्व मंडळींना गहिवरून आले होते.
पत्नीचे शेवटचे दर्शन व मुलांची भेटही नाही
आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांनी दोन मुलांना आणले होते. पत्नी मृत्यू पावल्याचे समजताच अशोकने पत्नीस बघण्याची व मुलांना भेटण्याची इच्छा पोलिसांकडे व्यक्त केली.
वडिलांच्या भेटीविषयी पोलिसांनी मुलांना विचारले असता, आमच्या आईला आमच्या डोळ्यासमोर ज्याने जाळले, त्याला आम्हाला भेटायचे नाही, असे मुलांनी स्पष्टपणे सांगून वडिलांनी व्यक्त केलेली इच्छा धुडकावून लावली. मुलांनी नकार दिल्याने अशोक ला मुलांना भेटणे तर दूरच; पण पत्नीचा शेवटचा चेहरादेखील पाहता आला नाही, असे सपोनि. राजपूत यांनी सांगितले.