परभणीला नेताना महिलेची रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती
By Admin | Updated: September 1, 2014 00:27 IST2014-09-01T00:22:52+5:302014-09-01T00:27:56+5:30
हट्टा : वसमत तालुक्यातील करंजाळा येथील एका गरोदर महिलेस वेळेवर आरोग्यसुविधा उपलब्ध न झाल्याने रूग्णवाहिकेमध्येच ती प्रसूत झाली.

परभणीला नेताना महिलेची रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती
हट्टा : वसमत तालुक्यातील करंजाळा येथील एका गरोदर महिलेस वेळेवर आरोग्यसुविधा उपलब्ध न झाल्याने रूग्णवाहिकेमध्येच ती प्रसूत झाली. ही घटना ३१ आॅगस्ट रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हट्टा गावाजवळ घडली.
करंजाळा गावात आरोग्य उपकेंद्र असून तेथे एका परिचारिकेची नियुक्ती आहे. सदर परिचारिका करंजाळा येथील उपकेंद्रात राहत नसल्याने ३० आॅगस्टच्या रात्री सारिका प्रभाकर चव्हाण (वय २५) या गरोदर महिलेला जवळा बाजार येथे न्यावे लागले; परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी तिला परभणी येथे नेण्यास सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णास पुन्हा करंजाळा येथे नेले. तेथून त्यांनी शासनाची मोफत व २४ तास सुविधा असलेली रुग्णवाहिका १०८ क्रमांकावर कॉल करून बोलावून घेतली. यावेळी रूग्णवाहिकेसोबत डॉ. शिंदे हजर होते. त्या गरोदर महिलेस परभणीकडे नेत असताना रुग्णवाहिकेमध्येच तिची प्रसूती झाली.
शासनाच्या रुग्णवाहिकेने तात्काळ सेवा दिल्यामुळे एका महिलेस उपचार मिळाले; परंतु शासनाने लाखो रुपये खर्च करून करंजाळा येथे उपकेंद्र बांधले व एका परिचारिकेची नियुक्ती केली; परंतु तेथील कर्मचारी व परिचारिका रात्री-बेरात्री येथे राहत नसल्याने खेडेगावातील रुग्णांचे हाल होत आहेत. मुख्यालयी न राहणाऱ्या खेडे गावातील कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)