आई राजा उदो..उदो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2016 01:15 IST2016-10-01T01:01:00+5:302016-10-01T01:15:17+5:30
तुळजापूर : ‘आई राजा उदो उदो’ ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष करीत व ढोल, ताशा, हलगी, झांजच्या निनादात हजारो भवानी ज्योतधारक शहरात

आई राजा उदो..उदो...
तुळजापूर : ‘आई राजा उदो उदो’ ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष करीत व ढोल, ताशा, हलगी, झांजच्या निनादात हजारो भवानी ज्योतधारक शहरात शुक्रवारी पहाटेपासून दाखल होवून भवानीज्योत प्रज्वलित करून आपापल्या गावाकडे परतले. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला अंदाजे एक लाख भाविक तुळजापूर नगरीत दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातील बीड, अहमदनगर, सोलापूर, पुणे, लातूर, उस्मानाबादह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या ठिकाणाहून शेकडो युवक भवानीज्योत घेऊन शहरात ठिकठिकाणी देवीचे गाणे म्हणत ठेका धरीत होते. यामुळे या उत्सवात चैतन्याचे वातावरण पसरले आहे. देवीभक्तांची वाढती गर्दी पाहून पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे. शहरात येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यासाठी उस्मानाबाद, लातूर, नळदुर्ग या रस्त्यावर विशेष वाहनतळ उभारून त्या ठिकाणी वाहने पोलिसांमार्फत अडवून लावली जात आहे. शहरातील शिवाजी चौक, बसस्थानक चौक, कमानवेस, किसान चौकी या सर्व रस्त्यांवर रस्ताबंदीची लाकडी बारकेटींग करून शहरात चारचाकी वाहनांना सकाळपासून प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे देवीभक्तांना रस्त्यावर अडथळा न होता सरळ मंदिरात जाण्यास सुलभ होत आहे.
महाद्वार चौक भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात ठिकठिकाणी, चौका-चौकात व गर्दीच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या गर्दीवर वॉचटॉवर व कॅमेरातून टेहळणी करण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध सूचना दिल्या जात आहेत. एकंदरीत प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षतेला प्राधान्य दिलेले दिसून येते. वाढती गर्दी पाहून न.प.ने २४ तास गर्दीच्या ठिकाणी जादा कामगार लावून साफसफाई सुरू केली आहे. बीदर, गुलबर्गा, लातूर, सोलापूरसाठी जादा बसेस सोडण्यात येत आहेत. (वार्ताहर)
शनिवारी पहाटेपूर्वी तुळजाभवानीची नऊ दिवसीय घोर निद्रा संपून सिंहासनावर पूर्व प्रतिष्ठापना केली जाईल. त्यानंतर विशेष पंचामृत अभिषेक पूजेस प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी सहा वाजता नित्योपचार, अभिषेक पूजा, अंगारा, धुपारती, नैवेद्य असे धार्मिक विधी संपन्न झाल्यावर पारंपरिक पद्धतीने मंदिर संस्थानच्या अध्यक्षांच्या दांपत्यांच्या वतीने मंदिरात घटस्थापना केली जाईल. या घटस्थापनेनंतर नऊ दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रम, पोथी वाचनसाठी ब्राह्मण वृंदास वर्दी दिली जाईल. सायंकाळी सात वाजता नित्योपचार, अभिषेक पूजा, प्रक्षाळ हे धार्मिक विधी व नरात्रोत्सवातील विशेष आकर्षण असलेल्या देवीचा छबिना निघून शेजारतीने पहिला माळेची सांगता होईल.