छत्रपती संभाजीनगर : वीस वर्षांची विवाहित मुलगी परस्पर घर सोडून बुलढाणा जिल्ह्यातील एका मुलासोबत राहायला गेली. यात कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार करून मुलीला परत आणण्याची विनंती केली. मात्र, मुलीने स्वमर्जीने गेल्याचे सांगून परत येण्यास नकार दिला. पोलिसांनी वेळेत अपेक्षित मदत न केल्याने तणावाखाली जाऊन मुलीच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घडलेल्या या घटनेनंतर संतप्त कुटुंबाने मृतदेहासह उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दोन तास ठिय्या दिला. अखेर रात्री ११:१५ वाजता तरुणासह त्याच्या कुटुंबावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेत पोलिस ठाणे सोडले व तणाव निवळला.
उस्मानपुरा परिसरात राहणारी २० वर्षीय विवाहित तरुणी ८ नोव्हेंबर रोजी कुटुंबाला काही न सांगता घर सोडून गेली. शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या पतीने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तपासात मुलगी रमानगरमधील वैभव बोर्डे याच्यासोबत बुलढाण्याला गेल्याचे उघडकीस आले. त्यांनी उस्मानपुरा पोलिसांना मुलीला परत आणून देण्याची विनंती केली. ही बाब कळताच वैभव बोर्डे मुलीसह बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. तेथे मुलीने पोलिसांसमोर ती स्वमर्जीने वैभवसोबत गेली असून कुटुंबाकडे परत न जाण्याचा जबाब लिहून दिला.
मुलीच्या काळजीने आईची आत्महत्याविवाहित मुलगी घर सोडून निघून गेली. तिचे बोर्डे कुटुंबाकडून बरेवाईट होण्याच्या भीतीने तिची आई चिंतित होती. मुलगी परत येत नसल्याचे कळाल्याने ती अधिक तणावाखाली गेली. गुरुवारी मुलीच्या ५० वर्षीय आईने राहत्या घरात गळफास घेतला. नेमका तेव्हा याच प्रकरणात मदतीची मागणी करण्यासाठी भाऊ पोलिस आयुक्तालयात गेला होता. आईने आत्महत्या केल्याचे कळतात त्याने घरी धाव घेतली.
उस्मानपुरा पोलिस ठाण्यात ठिय्या-या सर्व घटनाक्रमात मुलीचे कुटुंबीय सातत्याने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात जाऊन मुलीला परत आणून देण्याची विनंती करत होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपासिक अंमलदाराला कुटुंबासह बुलढाणाला जाऊन कारवाई करण्याची सूचना केली होती. मात्र त्यात दिरंगाई झाली.- कुटुंब पोलिसांसह बुलढाणा ग्रामीण पोलिसांकडे जाईपर्यंत सदर मुलगी वैभवसह जबाब नोंदवून निघून गेली होती. त्या तणावातूनच आईने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला.-त्या संतापातून कुटुंबाने रात्री आठ वाजता मृतदेह उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नेऊन ठेवला. वैभव व त्याच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करावा, वेळेत अपेक्षित कारवाई न केलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. ठाण्यातच मृतदेह आणून ठेवल्याने मोठा तणाव झाला. ठाण्याबाहेरही जमाव जमला. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, गजानन कल्याणकर, कृष्णा शिंदे, सचिन कुंभार, अविनाश आघाव यांनी ठाण्यात धाव घेतली. दंगा काबू पथक बोलावण्यात आले.
रात्री ताब्यात घेतला मृतदेहवैभव बोर्डे व त्याच्या कुटुंबामुळेच आईने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबाने केली. त्यानंतर पोलिसांनी वैभव, पार्वती, विशाल बोर्डे (रा. रमानगर), मनीषा पवार, नंदू पवार, राजेंद्र पवार (तिघेही रा. शास्त्रीनगर, बुलढाणा), गौरव बोर्डे, केसरबाई दगडू बोर्डे (रा. बदनापूर) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. शिवाय वेळेत अपेक्षित कारवाई न केलेल्या पोलिसांवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेत ठाणे सोडले. कुटुंबाने केलेल्या आरोपांमुळे व कारवाईतील दिरंगाईमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
... तर माझी आई वाचली असतीया संपूर्ण घटनेनंतर मुलीच्या भावाने माध्यमांशी संवाद साधला. माझी बहीण वैभवसोबत बुलढाण्याला गेली, ही बाब मी पोलिसांना कळवली होती. आम्ही त्यांना केवळ आमच्यासोबत येऊन मुलीशी बोलणे करून द्या, अशी विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली नाही. मी पोलिस ठाण्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. मात्र, कोणीही मदत केली नाही. पोलिसांनी वेळीच मदत केली असती तर माझी आई आज वाचली असती, असा आरोप मुलीच्या भावाने केला.