आमदार निधीतून सर्वाधिक कामे रस्त्यांची
By Admin | Updated: July 25, 2014 00:30 IST2014-07-25T00:03:22+5:302014-07-25T00:30:56+5:30
नांदेड : जिल्ह्यात आजघडीला रस्त्यांची दुरवस्था दिसत असली तरी जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपला ८० टक्क्यांहून अधिक निधी हा रस्ते विकासावरच खर्च केला आहे़

आमदार निधीतून सर्वाधिक कामे रस्त्यांची
नांदेड : जिल्ह्यात आजघडीला रस्त्यांची दुरवस्था दिसत असली तरी जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपला ८० टक्क्यांहून अधिक निधी हा रस्ते विकासावरच खर्च केला आहे़ जिल्ह्यात २०१०-११ ते २०१३-१४ पर्यंत १ हजार ३९४ रस्त्यांची कामे आमदार निधीतून झाली आहेत़ त्याखालोखाल विंधन विहिरी आणि सांस्कृतिक सभागृहावर आमदार निधीतून खर्च झाला आहे़
जिल्ह्यात ९ आमदार आणि १ विधान परिषद सदस्य आहे़ या लोकप्रतिनिधींनी आपल्याला मिळणाऱ्या स्थानिक आमदार निधीतून विकासासाठी सर्वाधिक पसंती ही रस्त्याला दिली आहे़ त्याखालोखाल पाणीपुरवठ्यासाठी विंधन विहिरींची कामे आमदार निधीतून घेण्यात आली आहेत़ जिल्ह्यात चार वर्षात ७२४ विंधन विहिरींची कामे झाली आहेत़ तर सांस्कृतिक सभागृहासाठीही आमदारांनी आपला निधी सढळ हस्ते दिला आहे़ त्यात चार वर्षातील कामांची संख्या ही ३९२ इतकी आहे़ त्यावर १६ कोटी ६४ लाख २९ हजार रूपये खर्च झाले आहेत़
आमदार निधीतून शैक्षणिक विकासासाठीही निधी देता येतो, सार्वजनिक ग्रंथालयांसाठी ग्रंथ खरेदी व बांधकामासाठीही निधी देता येतो़ जिल्ह्यातील एकाही आमदाराने निवडून आल्यानंतर २०१०-११ या पहिल्या वर्षात ग्रंथालयांसाठी १ रूपयाही निधी दिला नाही़
स्मशानभूमीच्या विकासासाठी काही प्रमाणात निधी दिला असला तरी तो अपुराच ठरला आहे़ २०१०-११ या वर्षात १४ स्मशानभूमीच्या कामांवर ३९ लाखांचा खर्च केला़ आमदार निधीतून जिल्ह्यात रस्त्यांच्या विकासावर २०१०-११ मध्ये १३ कोटी ११ लाख ४५ हजार रूपये खर्च झाला आहे़ तर २०११-१२ मध्ये १४ कोटी ४ लाख ७२ हजार, २०१२-१३ मध्ये ११ कोटी ८९ लाख ८८ हजार रूपये आणि २०१३-१४ मध्ये १० कोटी ९३ लाख १८ हजार रूपये खर्च झाले आहेत़
चालू आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्येही बहुतांशी आमदारांनी सुचविलेली कामे ही रस्त्यांची आहेत़ विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू झाला आहे़ झालेल्या कामांचा दर्जा ही बाब मात्र अलहिदाच आहे़