चालू वर्षी सर्वाधिक आत्महत्या
By Admin | Updated: November 21, 2014 00:48 IST2014-11-21T00:27:21+5:302014-11-21T00:48:19+5:30
बीड : सततच्या दुष्काळीस्थितीमुळे जगणेच कठीण होऊन बसलेले शेतकरी निराशेपोटी टोकाचे पाऊल उचलत आहेत़ मागील १४ वर्षांमध्ये कधीच झाल्या नव्हत्या इतक्या आत्महत्या

चालू वर्षी सर्वाधिक आत्महत्या
बीड : सततच्या दुष्काळीस्थितीमुळे जगणेच कठीण होऊन बसलेले शेतकरी निराशेपोटी टोकाचे पाऊल उचलत आहेत़ मागील १४ वर्षांमध्ये कधीच झाल्या नव्हत्या इतक्या आत्महत्या यावर्षी झाल्या आहेत़ तब्बल ८६ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले, त्यापैकी फक्त ५९ शेतकऱ्यांच्या कुटंबियांना मदत मिळाली़
कवी सुरेश भट यांची एक कविता प्रसिद्ध आहे़ ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...’ अशा या हृदय हेलावून टाकणाऱ्या पंक्ती! इथे तर जगण्याने छळलेच आहे; परंतु मरणानंतरही दुर्दैव पाठ सोडायला तयार नाही़ मागील चौदा वर्षांतील शेतकरी आत्महत्येच्या तुलनेत यावर्षी झालेल्या आत्महत्यांचा आकडा अधिक आहे़ ८६ पैकी केवळ ५९ आत्महत्या पात्र ठरल्या असून त्या सर्वांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे़ आत्महत्येनंतर शेतकरी कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाते; परंतु त्यासाठी पात्र- अपात्रतेच्या कसोटी पार करावी लागते़ शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यालाही पात्र- अपात्रतेत तोलले जाते़ पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मदतीचा हात पुढे केला जातो़
कर्ता पुरुष गेल्यावर आयुष्यभर पांढरे कपाळ घेऊन मुलाबाळांसह जगणाऱ्या महिलांच्या हातावर लाख रुपये टेकविल्यावर सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही़ शेतकरी आत्महत्येचं मोल लाखभर रुपयांत होऊच शकत नाही़ आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाय केले पाहिजेत, असे शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास आपेट म्हणाले़ (प्रतिनिधी)