भोकरदन तालुक्यातील तलावांतून सर्वाधिक गाळाचा उपसा
By Admin | Updated: April 11, 2015 00:17 IST2015-04-11T00:05:51+5:302015-04-11T00:17:59+5:30
फकिरा देशमुख , भोकरदन भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील तलावांतील गेल्या दीड महिन्यांमध्ये ५३ हजार ९०२ घनमीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती

भोकरदन तालुक्यातील तलावांतून सर्वाधिक गाळाचा उपसा
फकिरा देशमुख , भोकरदन
भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील तलावांतील गेल्या दीड महिन्यांमध्ये ५३ हजार ९०२ घनमीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
भोकरदन व जाफराबाद हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त असल्यामुळे या तालुक्यात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत विविध तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये काही ठिकाणी लोकसभागातून सुध्दा शेतकरी गाळ काढण्याची मोहीम राबवित आहेत. राजूर येथे १९ हजार ५७० घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. तर बरंजळा लोखंडे येथे १८ हजार ६०० घन मीटर तर जळगाव सपकाळ येथील दोन सिमेंट नाला बांधातील ४ हजार १०० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जाफराबाद तालुक्यातील आंबेगाव येथे ११ हजार ६३२ घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. तसेच बरंजळा साबळे येथे सुध्दा दिलासाच्या वतीने गाळ काढण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या वतीने गाळ काढण्यासाठी जे़सी़बी़ व पोकलॅन्ड देण्यात येत आहे. शेतकरी ट्रॅक्टरने हा गाळ घेऊन जात आहेत. शेतामध्ये गाळ टाकल्या तर किमान तीन ते चार वर्ष या शेतामध्ये शेणखत टाकावे लागत नाही. तसेच ज्या शेतात गाळ टाकला आहे अशा जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. शिवाय उत्पादन सुध्दा वाढते तसेच ज्या तलावातून गाळ काढला आहे. अशा तलावामध्ये पाणी साठवण क्षमता वाढली जाते. पर्यायाने त्या तलावाच्या परिसरातील विहिरीची पाणी पातळी वाढते. गाळामुळे संबंधित तलाव, नालाबांधामध्ये ४२़२७ स़घ़मीटर पाणी साठा थांबणार आहे. जाफराबाद तालुक्यात ११़६३ स़घ़ मीटर पाणी साठा साठवणार आहे़
भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील जे पाझर तलाव, मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी कमी झाली किंवा कोरडे झाले. अशा तलावातील गाळ काढण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दोन महिन्यामध्ये किमान १ लाख घन मीटर गाळ काढला जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०१३ मध्ये दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प कोरडा झाला होता. त्यावेळी लोकसहभाग तसेच सेवाभावी संस्थेच्या वतीने तसेच काही प्रतिष्ठितांनी या धरणातील गाळ काढण्यासाठी जे़सी़बी़ व पोकलॅन्ड देऊन या धरणातील १ लाख ब्रास गाळ काढला होता. त्यामुळे या धरणात २८३ टी़सी़एम़पाणीसाठा वाढला असल्याचे लघुसिंचन जलसंधारण विभागाचे कनिष्ट अभियंता आरक़े़ जाधव यांनी सांगितले. जर एवढा पाणी साठवयाचे झाल्यास किमान दोन पाझर तलाव नव्याने करावे लागले असते. त्यामुळे ज्या भागातील तलाव, मध्यम प्रकल्प, सिमेंट बांध कोरडे झाले असतील त्यामधील गाळ काढून शेतकऱ्यांनी शेतात टाकला तर उत्पादनात सुध्दा मोठी वाढ होते, असे जाधव यांनी सांगितले़
भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना आपल्या परिसरातील तलावातील गाळ काढून तो आपल्या शेतामध्ये टाकावयाचा आहे. अशा शेतकऱ्यांनी किंवा या परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन लोकसभागातून जे़सी़बी़ लावले तर या मशीनसाठी शासनाच्या वतीने डिझेलचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दुष्काळामध्ये आपल्या शेतामध्ये गाळ टाकावा. तसेच येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये भोकरदन तालुक्यातील धामणा मध्यम प्रकल्प जाफराबाद तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचे नियोजन करून त्यामधील गाळ काढण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पाझर तलावातील पाणी पातळी कमी झाली अशा ठिकाणचा सुध्दा गाळ काढण्यात येणार आहे.