अनधिकृत व्यक्तींकडून औषधांची सर्रास विक्री
By Admin | Updated: July 7, 2014 00:09 IST2014-07-06T23:12:57+5:302014-07-07T00:09:53+5:30
गढी : गेवराई तालुक्यातील गढीसह सिरसदेवी, पाडळसिंगी, मादळमोही येथील काही मेडिकलवर अनधिकृत व्यक्तींकडूनच औषध विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.

अनधिकृत व्यक्तींकडून औषधांची सर्रास विक्री
गढी : गेवराई तालुक्यातील गढीसह सिरसदेवी, पाडळसिंगी, मादळमोही येथील काही मेडिकलवर अनधिकृत व्यक्तींकडूनच औषध विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. औषध विक्रीचा परवाना फार्मासिस्टच्या नावे असला तरीही अनधिकृत व्यक्ती रुग्णांना औषध विकत असल्याने रुग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे.
गढी, सिरसदेवी, मादळमोही, पाडळसिंगी या ठिकाणी काही औषधी दुकाने आहेत. औषधी दुकानांसाठी औषध निर्माणशास्त्रातील तज्ज्ञ (फार्मासिस्ट) असणे आवश्यक आहे. असे असले तरी काही ठिकाणी औषध दुकानाचा परवाना फार्मासिस्टच्या नावे आहे. मात्र ती दुकाने संबंधित डॉक्टरचे नातेवाईक किंवा इतरच व्यक्ती चालवित असल्याचे दिसून येत आहे.
मेडिकलमध्ये फ्रीजसह इतर साधने व पुरेशी जागा आवश्यक असताना काही ठिकाणी अत्यंत छोट्या जागेत मेडिकलसह जनरल स्टोअर्स चालविले जातात. गांभीर्याची बाब म्हणजे काही बीएचएमएस डॉक्टरांच्या रुग्णालयाजवळच मेडिकल दुकाने आहेत. येथून अनधिकृत व्यक्ती औषधी विक्री करत असल्याने रुग्णांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशी अनधिकृत व्यक्तीकडून होणारी औषध विक्री तत्काळ बंद करावी, अशी मागणी रुग्णांसह नातेवाईकांकडून केली जात आहे.
याबाबत औषधी निरीक्षक चांडक म्हणाले की, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. लेखी तक्रार असल्यास पुन्हा कारवाई करु.
(वार्ताहर)
गेवराई तालुक्यातील गढीसह पाडळसिंगी, मादळमोही, सिरसदेवी येथील काही मेडिकलवर होत आहे अनधिकृत व्यक्तींकडून औषध विक्री
मेडिकल दुकानांमध्येही फ्रीजसह इतर साधनांचा अभाव