दोन हजारापेक्षा जास्त शेतकरी वजनाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: April 6, 2017 23:33 IST2017-04-06T23:31:09+5:302017-04-06T23:33:16+5:30
कळंब : तालुक्यातील एकमेव सुरू असलेल्या तुर खरेदी केंद्राचा काटा बारा दिवसापासून बारदाना नसल्याने बंद होता.

दोन हजारापेक्षा जास्त शेतकरी वजनाच्या प्रतीक्षेत
कळंब : तालुक्यातील एकमेव सुरू असलेल्या तुर खरेदी केंद्राचा काटा बारा दिवसापासून बारदाना नसल्याने बंद होता.अखेर बुधवारी रात्री कळंब केंद्रावर दोन हजार कट्टे बारदाना पोहचल्याने गुरुवारी पुन्हा खरेदी विक्री केंद्र्रावरील काटा हलला. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या घेतलेल्या नोंदीनुसार अद्याप दोन हजारापेक्षा जास्त शेतकरी वजनाच्या प्रतीक्षेत असल्याने खरेदी विक्री संघाने आगामी काळात गती वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कळंब तालुक्यात गत खरीप हंगामात तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. तुरीच्या पिकास पोषक अशा पाऊस पावसाळ्याच्या उत्तरार्धात झाल्याने पिक चांगल्यापैकी बहरले होते. यामुळे प्रतिएकरी उत्पादन समाधानकारक झाले होते. तालुक्यातील खामसवाडी, मोहा,नायगाव, पाडोळी येरमळा, इटकूर, मंगरूळ, शिराढोण आदी भागात तुरीच्या बहराने शेतकऱ्यांत चांगलाच उल्हास आला होता.
परंतु, हा आनंद बाजारातील दराच्या घसरणीमुळे औटघटकेचाच ठरला. शासनाने नाफेड व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हमीभावाने तुर खरेदी करण्यास सुरुवात केली. कळंब येथे यानुसार ५०५० रुपए प्रतिक्विंटल या दराने दोन खरेदी केंद्रे सुरु झाली. खुल्या बाजारात यापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्र्रावर माल घालण्यासाठी गर्दी केली. परंतू, आवश्यक असणारा बारदाना पुरवण्यात मार्केटिंग फेडरेशनला अपयश येवू लागले.यामुळे खरेदी केंद्रावरील खरेदीस वांरवार ब्रेक लागत आला. यातच तालुक्यात शेतकरी कंपन्याच्या महासंघाची सुरु असलेली पाच केंद्रेही अचानक बंद पडली.खामसवाडी सेवा संस्थेचे केंद्रही अचानक बंद झाले. यामुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या एकाच केंद्रावर सर्व भार येवू लागला.परिणामी गत दोन महिन्यापासुन मापे होत नसल्याने शेतकयांची मोठी हेळसांड होत होती.
बारदान्यामुळे बारा दिवस बंद
कळंब येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या तुर खरेदी केंद्रास दररोज किमान हजार कट्टे बारदान्याची आवश्यकता आहे. परंतु, याप्रमाणात मार्केट फेडरेशनकडून बारदाना पुरवण्यात येत नव्हता.अखेर २५ मार्चपासुन बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी विक्री संघाचे हे केंद्र्र बंद ठेवावे लागले. बारा दिवसापासुन खेरदी केंद्र्र बंद असल्याने खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यासह शेतकर्यांनाही हात हलवत बसावे लागले होते.अखेर ५ एप्रिल रोजी मार्केट फेडरेशनने कळंब केंद्र्रास २००० कट्टे बारदाना पुरवला आहे. यातुन आता १००० क्विंटल तुरीची खरेदी होणार आहे. परंतु, पुरवण्यात आलेला हा बारदानाही अत्यल्प असून, आगामी दोन दिवसात पुन्हा बारदान्याचा स्टॉक निरंक होणार असल्याचे सुत्राकडून समजते. (वार्ताहर)